जागेची मालकी बदलली तरी थकबाकी चुकत नाही

महाविरतण अभय योजनेचा लाभ घ्या अन् थकबाकीमुक्त व्हा

by Team Satara Today | published on : 22 March 2025


बारामती : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार, वीजबिलांची थकबाकी असलेल्या एखाद्या जागेची मालकी बदलली तरी नवीन जागा मालकाला थकबाकी चुकत नाही ती भरावीच लागते. अशा कायमस्वरुपी बंद असलेल्या बिगरशेती ग्राहकांसाठी महावितरणची अभय योजना सुरु आहे. योजनेची मुदत ३१ मार्चला संपणार आहे. तत्पूर्वी पात्र ग्राहकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

 वीजबिलांच्या थकबाकीमुळे दि. ३१ मार्च २०२४ पर्यंत कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेल्या तसेच कृषी व सार्वजनिक पाणीपुरवठा योजना वगळून उर्वरित सर्व बिगरशेती वीजग्राहकांसाठी महावितरण अभय योजना दि. ३१ मार्च २०२५ पर्यंत सुरू आहे.

थकबाकीदारांनी केवळ मूळ थकबाकीचा भरणा केल्यास संपूर्ण १०० टक्के व्याज व विलंब आकार (दंड) माफ होत आहे. मूळ थकबाकीचा एकरकमी भरणा केल्यास लघुदाब ग्राहकांना १० टक्के तर उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के अतिरिक्त सूट मिळत आहे. यासोबतच सुरवातीला मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम व्याजमुक्त सहा हप्त्यांत भरण्याची देखील सोय आहे. तसेच लाभार्थी ग्राहकांना मागणीनुसार त्या जागेवर नव्याने जोडणी दिली जाणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून थकबाकीमुक्तीसाठी वीजग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर यांनी केले आहे.

बारामती परिमंडलात २ लाख ७७ हजार ४७२ ग्राहक अभय योजनेसाठी पात्र होते. यामध्ये बारामती मंडलात ६७ हजार २९३, सातारा ५४ हजार ८९६ व सोलापूर जिल्ह्यात १ लाख ५५ हजार २५० ग्राहकांचा समावेश आहे. मात्र यातील बारामती मंडलात ३३२४, सातारा मंडल १८९३ व सोलापूर मंडलातील ५५९८ ग्राहकांनी आतापर्यंत अभय योजनेचा लाभ घेत अनुक्रमे ३ कोटी ६० लाख, २ कोटी ३५ लाख व ४ कोटी ६८ लाख असा १० कोटी ६५ लाखांचा भरणा केला आहे. लाभार्थी पैकी ४२०४ ग्राहकांनी आहे ते कनेक्शन पुर्नजोडणी केले. तर २९७९ ग्राहकांनी नव्याने वीज जोडणी घेतली.

अभय योजनेत सहभागी होण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तसेच मोबाईल अॅपमध्ये सुविधा उपलब्ध केली आहे. ऑनलाईन शक्य नसल्यास अधिक माहितीसाठी नजीकच्या कार्यालयात संपर्क साधावा.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गैरप्रकार रोखण्यासाठी डीबीटी व ऑनलाईन निवड प्रक्रिया : मंत्री जयकुमार गोरे
पुढील बातमी
देवस्थान इनाम जमिनीबाबत कायदा करणार : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

संबंधित बातम्या