सातारा : प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचे पुरस्कार प्रेरणादायी व सामाजिक बांधिलकी जोपासणारा कृतज्ञतेचा उत्तम आदर्श आहे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, संबोधी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोल्हापूर विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता,रमेश इंजे यांनी व्यक्त केले.
येथील कोपर्डे प्रतिष्ठानच्या वतीने साहित्य, कला, संस्कृती व समाज परिवर्तनासाठी देण्यात येणारे नवव्या वर्षीचे पुरस्कार प्रमुख पाहुणे रमेश इंजे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील विविध भागातील सहा मान्यवर साहित्यिक, कलावंत, कार्यकर्त्यांना प्रदान करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते .विचारमंचावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे, विश्वस्त समीक्षक डॉ.गजानन अपिने, ज्योत्स्ना पाटील-शिंदे, गझलकार वसंत शिंदे व सूत्रसंचालक चित्रा भिसे आदी मान्यवर उपस्थित होते.
रमेश इंजे म्हणाले, महात्मा गांधीजींचे जीवन कार्य समाजाच्या शेवटच्या माणसा प्रती समर्पित होते. त्यांच्या स्मृतीदिनी जाणीवपूर्वक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात येतोय हे औचित्यपूर्ण आहे. लोकशाही विरोधी व गांधीजींच्या विचारांना तिलांजली देणाऱ्या सध्याच्या प्रतिक्रांतीच्या काळात सजग राहण्याची गरज आहे.
पुरस्कार विजेत्यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सर्जनशील कलाकृती निर्मितीची प्रक्रिया सांगितली, व पुरस्काराने उमेदीने काम करण्यास प्रोत्साहन आणि अधिक बळ मिळाले. अशा भावना व्यक्त करुन देशातील भयावह फॅसिस्ट परस्थिती बाबत चिंता प्रकट केली.
प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी, साहित्यिक प्रमोद मनोहर कोपर्डे प्रतिष्ठानचा हेतू विषद करताना म्हणाले, नव्या पिढीतील चांगल्या सर्जनशील कलावंतांचा, कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांना बळ देण्याचे व साहित्यिक,सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात नवविचार रुजविण्याचे काम गेल्या ९ वर्षापासून प्रतिष्ठान करीत आहे.
आज देशातील वातावरण चिंताजनक व अस्वस्थ करणारे आहे. हिंसा उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. त्याबाबत एकमेकांशी संवाद चालू ठेवण्याची खूपच गरज निर्माण झाली आहे.
पुरस्काराचे एकूण ९ व्या व या वर्षातील पाचव्या पुरस्कार सोहळ्यात वीस हजाराचा धनादेश, मानचिन्ह, शाल, सातारी कंदी पेढे देऊन पुरस्काराचे मानकरी प्रसिद्ध कथाकार, ललित गद्य लेखक सुचिता घोरपडे, पुणे (कमल मनोहर कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार), प्रसिद्ध नाट्य सिने लेखक, दिग्दर्शकनितीन दीक्षित, सातारा (प्रा. मनोहर कोपर्डे स्मृती कला पुरस्कार), संत साहित्याचे प्रसिद्धअभ्यासक, भाष्यकार डॉ.रवींद्र श्रावस्ती, सांगली (डॉ. चंद्रशेखर जहागीरदार स्मृती संस्कृती पुरस्कार), प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक मिलिंद चव्हाण, पुणे (हुतात्मा विलास ढाणे स्मृती समाज परिवर्तन पुरस्कार) तसेच नवोदित लेखकासाठींचा दहा हजारांचा धनादेश, मानचिन्ह, शाल, सातारा कंदी पेढे, अशा स्वरुतील पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील कवी, कादंबरी लेखक संतोष जगताप, सांगोला (राधाबाई किसन कोपर्डे स्मृती साहित्य पुरस्कार) व प्रख्यात एकांकिका, नाट्यलेखक, कलावंत, दिग्दर्शक ममता बोल्ली, सोलापूर (पारुबाई भानुदास परदेशी स्मृती कला पुरस्कार) देऊन गौरविण्यात आले.
चित्रा भिसे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. या हृद्य सोहळ्यास पुरस्कार विजेत्यांचे कुटुंबीय, तसेच समीक्षक डॉ.दत्ता घोलप (वाई) ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकिहाळ, दिनकर झिंब्रे, डॉ.शिवाजीराव पाटील, डॉ.सुनिल गायकवाड, डॉ.सुर्यकांत गायकवाड, लेखक जयवंत भिसे ,प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांच्यासह अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.