कराड : कराडातील एका सराफी व्यावसायिकाचा विश्वास संपादन करत त्यास बनावट सोन्याची 11 बिस्किटे विकून गंडा घालण्याच्या प्रयत्नात असणार्या तीन संशयितांना कराड शहर पोलिसांनी गजाआड केले आहे. 550 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे 50 लाखांना विक्री करण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
गोविंद एकनाथराव पदातुरे (वय 40, रा. भुतेकरवाडी, ता. अहमदपूर, जि. लातूर), सर्जेराव आनंदा कदम (वय 36, रा. पिसाद्री, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर) आणि अधिक आकाराम गुरव (वय 50, रा. म्हासुर्णे, ता. खटाव, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेेत. हे तिन्ही संशयित कराडमध्ये एका सराफी व्यावसायिकाला बनावट सोन्याची बिस्किटे खरी असल्याचे भासवत 50 लाखांना विक्री करण्यासाठी आले होते; मात्र संबंधित सराफी व्यावसायिकाने संशयितांचा डाव ओळखत घटनेची माहिती कराड शहर पोलिसांना दिली.
या माहितीवरून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या सूचनेवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचार्यांनी कराडजवळील गोवारे गावच्या हद्दीत गजानन हौसिंग सोसायटी परिसरात सापळा रचला होता. संशयितांची ओळख पटताच पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेत त्यांच्याकडील बनावट सोन्याची बिस्किटे हस्तगत केली आहेत. ताब्यातील संशयितांनी यापूर्वी कोणाला बनावट सोने विक्री करून फसविले आहे का ? वेगवेगळ्या जिल्ह्यातील संशयित एकत्रित कसे आले ? आणखी कोणी साथीदार आहेत का? याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.