आरटीई प्रवेश नाकारल्यास कारवाई

सातारा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांतील 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची सोडत नुकतीच जाहीर करण्यात आली. या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना लघुसंदेश पाठवण्यात येणार आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारणार्‍या शाळांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषदेच्या (एससीईआरटी) कार्यालयात आरटीई प्रवेशाची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी चिठ्ठ्यांद्वारे ऑनलाईन सोडतीसाठीचे क्रमांक काढले. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधक परिषदेचे संचालक राहूल रेखावार, योजना संचालक महेश पालकर, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे उपस्थित होते.

आर्थिक दुर्बल व वंचित घटकांमधील मुलांना चांगल्या शाळांमध्ये उत्कृष्ट शालेय शिक्षण मिळण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यामुळे अधिकाधिक मुलांना शिक्षणाची संधी मिळून ते देशाच्या विकासात योगदान देतील. खासगी शाळांनी मुलांचे आरटीई प्रवेश नाकारल्यास संंबंधितांवर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे आरटीई प्रवेशाचे प्रलोभन दाखवणार्‍या दलालांवरही कारवाई करण्यात येईल. त्यासाठी पालकांनी पुढे येऊन संबंधित शाळा किंवा व्यक्तींची माहिती शिक्षण विभागाला द्यावी, असे आवाहन आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी केले.

मागील बातमी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठात छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये गोमंतकीय संस्कृतीचे दर्शन
पुढील बातमी
'मितवा' या सिनेमानं 'मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या' हे दिलेलं सूत्र आजही प्रेक्षकांच्या आठवणीत

संबंधित बातम्या