सातारा : राज्यातील पहिला मराठी भाषा पंधरवडा मसाप, पुणे शाहुपुरी शाखा आणि सातारा नगरपालिकेच्यावतीने सुरु करण्यात आला. यंदा या मराठी भाषा पंधरवड्याचे १४ वे वर्ष असून २७ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या भाषा पंधरवड्यास गुरुवार दि. 27 फेब्रुवारी पासून प्रारंभ होत असल्याची माहिती मसाप पुणे, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, साताऱ्यात साहित्यिक चळवळीत महत्वाचे योगदान देणाऱ्या मसाप, शाहुपुरी शाखेचे संस्थापक अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्षापूर्वी सातारा नगरपालिकेच्या सहकार्याने राज्यातील मराठी पहिला मराठी भाषा पंधरवडा सुरु करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांची जयंती आणि वि.दा.करंदीकर यांचा स्मृतीदिनाचे औचित्य साधून या कालावधीत विविध कार्यक्रम घेतले जातात. याहीवर्षी श्री. विनोद कुलकर्णी यांनी भाषा पंधरवड्याचे नियोजन केले असून यंदाचे हे १४ वर्ष आहे. त्याचा प्रारंभ मंगळवार दि. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नगरवाचनालयाच्या पाठक हॉल येथे होणार आहे.
मराठी भाषा पंधरवड्याचे उद्घाटन 'रावण' या पुस्तकाचे लेखक, प्रेरणादायी व्याख्याते शरद तांदळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी खा.श्री.छ.उदयनराजे भोसले हे असणार आहेत. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, दै.सकाळचे सहयोगी संपादक राजेश सोळसकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
कार्यक्रमास सर्व साहित्यप्रेमी, सातारकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन असे आवाहन, मसाप, शाहुपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, उपाध्यक्ष विक्रम पाटील, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि सदस्यांनी केले आहे.