सातारा : सोनगाव कचरा डेपोत लागलेल्या भीषण आगीच्या संदर्भात आणि घनकचरा व्यवस्थापन टेंडरमधील कोट्यावधी रुपयांचा झालेला भ्रष्टाचार याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे सामाजिक कार्यकर्ते प्रा. गणेश वाघमारे यांनी एकदिवसीय लक्षवेधी भ्रष्टाचार पोलखोल आंदोलन केले.
सातारा नगरपालिका भ्रष्टाचार विषयाबाबत जिल्हा प्रशासन व प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी गांभीर्य का दाखवित नाहीत ? असा सवाल उपस्थित करून प्रशासनाला याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यानी निवेदन स्वीकारत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गणेश वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात सातारा नगरपालिकामार्फत सोनगाव कचरा डेपो टेंडरमध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे . तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समितीमार्फत या टेंडरमधील कामाचे व झालेल्या सर्व खर्चाचे, करारनामामधील कामाचे, दैनंदिन अहवाल, मासिक कार्य अहवाल याचे ऑडिट करण्यात यावे.
चुकीच्या पद्धतीने बिल अदा करणाऱ्या आरोग्य निरीक्षक, मुख्य लेखापाल यांना तात्काळ निलंबित करून याबाबत त्यांची चौकशी करून झालेल्या भ्रष्टाचार व कचरा डेपो डेपो येथिल नुकसान भरपाई वसुल करण्यात यावी. तसेच संबंधित दोन्ही ठेकेदार संस्था 1. Ecosave संस्था व 2. शिव नंदन संस्था या संस्थेचे सर्व अनामत जप्त करण्यात यावेत तसेच संबंधित संस्थांच्या चुकीच्या कामामुळे सोन गाव कचरा डेपोला लागलेल्या भीषण आगीत कोट्यावधी रुपयेच्या मशीन व सोलर पॅनेल यांचे नुकसान झालेले आहे तसेच काम न करता नियमित मासिक बिल संस्थानी घेतले आहेत त्याची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व बिल रक्कम पोटी अदा केलेली सर्व रक्कम वसुल करण्यात यावे व संबंधित दोन्ही संस्था याना ठेका रद्द करून काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावे. शासनाची फसवणूक, गैरव्यवहार, कामात निष्काळजीपणा, आर्थिक हितसंबंध यातून नगरपालिका सातारा चे कोट्यावधी रुपये ची खर्च याबाबत तात्काळ आरोग्य निरीक्षक, मुख्य लेखापाल व दोन्ही ठेकेदार संस्था प्रमुख यांचे कडक कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात यावेत या प्रमुख मागणी केल्या आहेत.
संदर्भिय विषयाबाबत तात्काळ ठोस कारवाई झाली नाही तर आम्हाला सर्व गावातील नागरिक व संघटनेचे कार्यकर्ते यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर अधिकारी यांना जागे करण्यासाठी जागरण गोंधळ कार्यक्रम करावा लागेल. दि. 30 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ कार्यक्रम होत असून यावेळी निर्माण होणार्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नासाठी जिल्हाधिकारी व नगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, याची नोंद घ्यावी.
अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते गणेश वाघमारे यांनी दिले आहे.