तामिळनाडू : दक्षिणेतील सुपरस्टार आणि कोट्यवधी प्रेक्षकांवर अधिराज्य करणारा विजय थलापती आता सक्रिय राजकारणात उतरला आहे. दक्षिणेत अभिनेत्याने राजकीय नेता होण्याची ही काही पहिली घटना नाही. दक्षिणेतील ती परंपरा आहे. इतर कलाकाराप्रमाणे विजय थलापतीने राजकीय वळण घेतले. तो आज त्याचा नवीन पक्षाचा अधिकृत झेंड्याचे अनावरण करणार आहे. त्याच्या पक्षाचे नाव ‘तमिझागा वेत्री कषगम’ असे आहे. त्याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पार्टी’ असा होतो.
21 ऑगस्ट रोजी समाज माध्यम ‘X’ वर विजयने माहिती दिली. त्यानुसार, 22 ऑगस्ट रोजी तो पक्षाचा झेंडा अधिकृतरित्या जाहीर करेल. पनाईयुर येथील पक्षाच्या कार्यालयात हा पक्ष ध्वज फडकवण्यात येणार आहे. त्याचवेळी पक्ष गीत पण जाहीर करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणूक 2026 मध्ये विजय थलापतीचा पक्ष उतरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच तामिळनाडूमध्ये चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या सुरुवातीला विजयने राजकारणात अधिकृत प्रवेश केला होता. पण लोकसभेला त्याने कोणत्याही पक्षाला, आघाडी, युतीला समर्थन दिले नव्हते.
पक्ष स्थापण्याची आणि राजकारणात उतरण्याचे जाहीर केल्यानंतर विजय थलापतीने अपूर्ण असलेल्या चित्रपटाचे काम पूर्ण केले. याविषयीची माहिती त्याने त्याच्या चाहत्यांना दिली. पक्षाच्या कामात व्यत्यय न आणता सिनेमा पूर्ण केल्याचे तो म्हणाला. त्याने या नवीन पक्षावर लोकांनी प्रेम व्यक्त केल्याबद्दल तामिळनाडूतील जनतेचे आभार व्यक्त केले.
राजकारण हा आपला व्यवसाय नाही. तर एक पवित्र लोकसेवा आहे. ‘तमिझागा वेत्री कषगम’ याचा अर्थ ‘तामिळनाडू विजय पार्टी’ असा होतो. मी लोकांच्या सेवेसाठी स्वतःला झोकून देणार असल्याचे विजय म्हणाला. यापूर्वीचा इतिहास चाळला तर अनेक अभिनयाच्या दुनियेतील अनेकांनी राजकीय जीवनात प्रवेश केला आहे. त्यात सर्वात महत्वाचे एम जी. रामचंद्रन आणि जयललीता आहेत.
अभिनेता विजय याची तामिळनाडूमध्ये मोठी फॅन फॉलोईंग आहे. त्याने यापूर्वी अनेक सामाजिक कार्यात हिरारीने सहभाग घेतला आहे. डिसेंबर 2023 मध्ये त्याने थूथुकुडी आणि तिरुनेलवेली जिल्ह्यातील पुरग्रस्तांना मोठी मदत केली होती. पूरग्रस्तांना साधनसामुग्री पोहचवली होती. त्याच्या नावावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत.