सातारा : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत जावली तालुक्यातील मेढा ग्रामीण रुग्णालय आणि केळघर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नुकतेच हे शिबीर घेण्यात आले असून यामध्ये ५५५ बालकांची तपासणी करून त्यांच्यावर आवश्यक औषधोपचार करण्यात आले.
ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील हृदयविकार असणाऱ्या बालकांची तपासणी व उपचार करण्याबाबत प्रशासनाला सूचना करून या शिबिराचे आयोजन केले असून राज्य सरकारने बालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आलेल्या शिबिरात ८४ बालकांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर १९ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्या बालकांचे जीवन खऱ्या अर्थाने फुलले. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील ० ते १८ वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने मेढा व केळघर येथे बालकांचे हृदयरोग तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये ५५५ बालकांची मोफत टूडी ईको तपासणी करण्यात आली. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या बालकांवर योग्य ते उपचार करण्यात आले.
शिबिरात तपासणी पथकामध्ये खारघर येथील सत्यसाई हॉस्पिटलमधील डॉ. जयश्री मिश्रा, डॉ. ऋषिकेश वडके, डॉ. सई पाटील, डॉ. गायत्री, कोऑर्डिनेटर सागर सावंत यांच्यासह नर्सिंग स्टाफ सहभागी होता. शिबीर यशस्वी करण्यासाठी आरोग्य सचिव डॉ. सचिन जाधव यांनी सहकार्य केले. आवश्यक रुग्णांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संबंधित बालकांवर हृदय शस्त्रक्रिया तसेच आवश्यक उपचार तातडीने होण्यासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत.