रत्नागिरी : भारतासाठी ‘मोस्ट वॉन्टेड’ असलेला दहशतवादी आणि फरार गुन्हेगार दाऊद इब्राहिम याच्याशी संबंधित मालमत्तांच्या लिलावाला अखेर यश आले असून, रत्नागिरी जिल्ह्यातील त्याच्या वडिलोपार्जित शेतजमिनींना खरेदीदार मिळाला आहे. खेड तालुक्यातील मुंबके गावात असलेल्या या जमिनी ५ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या लिलाव प्रक्रियेत मुंबईतील एका गुंतवणूकदाराने सर्वाधिक बोली लावत आपल्या नावे केल्या आहेत. दाऊदचे मूळ गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरातील अनेक जमिनी पूर्वी त्याची आई अमिना बी यांच्या नावावर नोंद होत्या. केंद्र सरकारने ‘साफेमा’ कायद्यांतर्गत या मालमत्ता जप्त करून त्यांचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली होती आणि अखेर ती यशस्वी ठरली.
या लिलावात चारही भूखंड एकाच खरेदीदाराने विकत घेतले असून, त्यामधील सर्वात मोठा सर्वे क्रमांक ४४२ असलेला भूखंड दहा लाख रुपयांहून अधिक किमतीला विकला गेला आहे, तर उर्वरित भूखंडांचीही विक्री वेगवेगळ्या किमतीत पूर्ण झाली आहे. लिलावाच्या अटींनुसार, खरेदीदाराला एप्रिल २०२६ च्या सुरुवातीपर्यंत संपूर्ण रक्कम भरावी लागणार असून त्यानंतरच व्यवहाराची कायदेशीर पूर्तता होणार आहे.
दरम्यान, या जमिनींच्या विक्रीसाठी सरकारने गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले होते. यापूर्वी २०१७, २०२०, २०२४ आणि २०२५ मध्येही लिलावाचे आयोजन करण्यात आले होते, मात्र दाऊदच्या नावाशी संबंधित भीतीमुळे अनेक वेळा खरेदीदारांनी मागे हटत बोली प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. काही वेळा तांत्रिक अडचणी आणि कायदेशीर वादांमुळेही व्यवहार पूर्ण होऊ शकले नव्हते. त्यामुळे यंदाचा लिलाव यशस्वी ठरणे हे महत्त्वाचे मानले जात आहे.
१९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला दाऊद इब्राहिम हा अजूनही फरार असून भारतीय तपास यंत्रणांच्या मते तो सध्या पाकिस्तानात वास्तव्यास आहे. या पार्श्वभूमीवर त्याच्या मालमत्तांचा लिलाव यशस्वी होणे हे प्रशासनाच्या दृष्टीने एक मोठे पाऊल मानले जात आहे.