सातारा : कर्तव्य सोशल ग्रुप, सातारा यांच्यावतीने कुमठे येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिरात ३०० रुग्णांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी गरजू रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच ५५ रुग्णांना मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुणे येथे पाठवण्यात आले.
कुमठे ता. सातारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने झालेल्या या शिबिराचे उदघाटन श्रीमंत छ. रुद्रनिलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी उप सभापती अरविंद चव्हाण, सुरेंद्र देशपांडे, आरोग्य केंद्राचे डॉ. हजारे, अखिलेश चव्हाण, विलास कासार, महेश यादव, गुलाब भोसले, ऍड. चंद्रकांत बेबले आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळण्यासाठी त्या- त्या भागातील पदाधिकारी विविध उपक्रम राबवतात ही बाब कौतुकास्पद आहे. कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून विविध प्रकारची आरोग्य शिबिरे सातत्याने घेतली जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील गोर- गरीब रुग्णांना याचा लाभ होत आहे. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कर्तव्य सोशल ग्रुप नेहमीच कटिबद्ध राहिला आहे. समाजातील प्रत्येक घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी कर्तव्य ग्रुप नेहमीच अग्रेसर राहील, असे रुद्रनिलराजे याप्रसंगी म्हणाले.