सातारा : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मालदेव नियतक्षेत्रात गस्त घालत असताना, एका वनमजुरावर रानगव्याने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना शनिवारी (दि. २०) दुपारी घडली. सुभाष तुकाराम गुरव (वय ४५) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनमजुराचे नाव आहे.
सुभाष गुरव हे आपले नित्याचे कर्तव्य बजावत जंगलात गस्त घालत होते. त्यावेळी अचानक समोर आलेल्या विशालकाय रानगव्याने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या अनपेक्षित हल्ल्यात गव्याने गुरव यांच्या छातीचा आणि पायाचा अक्षरशः चुराडा करण्याचा प्रयत्न केला. यात ते रक्तबंबाळ झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
जंगलाच्या वाटेवर, जिथे कोणतीही आधुनिक वैद्यकीय साधने उपलब्ध नव्हती, तिथे आपल्या सहकाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी वनरक्षक गणेश भोऱ्हडे आणि आनंद मरागजे यांनी अचाट धाडस दाखवले. गुरव हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना, या दोघांनी आणि इतर वनपालांनी जिद्दीने त्यांना तिथून बाहेर काढले. त्यांच्या या तत्परतेमुळेच गुरव यांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे शक्य झाले.
घटनेनंतर वनविभागाच्या पथकाने गुरव यांना तातडीने साताऱ्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, छातीला आणि पायाला झालेली दुखापत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या ते तिथे मृत्यूशी झुंज देत आहेत.या बचाव कार्यात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, उपसंचालक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक बाबा हाके, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, वनपाल संदीप पवार, प्रवीण मोरे यांनी मोलाची भूमिका बजावली.
जीवावर उदार होणाऱ्याला 'मदतीचा हात' हवाच !
वनाचे रक्षण करताना वनकर्मचारी आपला जीव धोक्यात घालतात, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. जखमी सुभाष गुरव यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे शासनाने केवळ थातूरमातूर मदत न करता, त्यांना तातडीने मोठी आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.