देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग

by Team Satara Today | published on : 08 April 2025


छत्रपती संभाजीनगर : देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग लागल्याची माहिती आहे. या आगीत अनेक प्राणी आणि वनस्पतींना धोका निर्माण झाला आहे, तसेच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. देवगिरीच्या किल्ल्याला दौलताबाद किल्ला म्हणून सुद्धा ओळखले जाते. देवगिरी किल्ल्याला सर्व बाजूंनी आग का लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इतिहासामध्ये अनेक महत्त्वपूर्ण घटनांचा साक्षीदार असलेल्या दौलताबाद अर्थात देवगिरीचा किल्ला हा आगीच्या विळख्यात अडकला आहे. किल्ल्याच्या चारही बाजूंनी आग लागली असून किल्ला हा आगीच्या भक्ष्यस्थानी आला आहे. आगीचे कारण समोर आलेले नसले तरी हे ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान मानले आहे. उन्हाळ्याच्या झळांमुळे ही आग भडकली असल्याची प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना आगीचे लोट पसरलेले दिसून येत आहे. तसेच आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणांत धूर पसरला असल्याचे देखील दिसून येत आहे.

उन्हाळा सुरु झाल्यामुळे राज्यामध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झाली आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वाढणाऱ्या या रखरखत्या उन्हामुळे वणवा लागण्याची मोठी शक्यता असते. असाच प्रकार देवगिरी किल्ल्याच्या बाबत घडला असल्याचे बोलले जात आहे. किल्ल्याच्या आवारामध्ये असणाऱ्या गवताला आणि झाडाझुडपांना उन्हामुळे आग लागल्याची शक्यता आहे. तसेच वाहता वारा असल्यामुळे आगीची प्रमाण वाढले. त्यामुळे किल्ला आगीच्या भक्ष्यस्थानी आला. किल्ल्याची आग विझवण्यासाठी सिडकोचे अग्निशमन दल आणि महानगर पालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. मात्र किल्ल्याच्या आतील भागांमध्ये अग्निशमन दलाची वाहने घेऊन जाण्यास अडचण निर्माण होत आहे. दौलाताबादच्या किल्ल्याला अनेकदा वणवा लागल्याचे दिसून आले आहे. यावेळी देखील उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर किल्ल्याला आग लागली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन
पुढील बातमी
शैक्षणिक साहित्य वाटप करून डॉ. आंबेडकर जयंतीचा निर्धार : श्री रमेश उबाळे

संबंधित बातम्या