काशिनाथाच्या नावानं चांगभलं च्या गजरात बावधनचे शेकडो ग्रामस्थ जलमंदिरावर

खा. श्री. छ. उदयनराजेंना दिले बगाड यात्रेचे आमंत्रण

by Team Satara Today | published on : 14 March 2025


सातारा : महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि मानाची यात्रा समजल्या जाणार्‍या बावधन, ता. वाई येथील भैरवनाथ महाराज यात्रेचे आमंत्रण बावधन व पंचक्रोशीतील नागरिकांनी शेकडोंच्या संख्येने हलगी, तुतारीच्या निनादामध्ये काशिनाथाच्या नावानं चांगभलं च्या गजरात जलमंदिर पॅलेस वर जात सातारा लोकसभा मतदारसंघाचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना दिले. यावेळी ग्रामस्थांनी यात्रेला उपस्थित राहण्याची विनंती करुन त्यांचा सत्कार केला.

बावधन, ता. वाई येथील बगाड यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी महाराष्ट्रातील लाखो लोक हजेरी लावत असतात. काल दि. 12 रोजी येथील भैरवनाथ महाराज मंदिरामध्ये कौल लावून यंदाच्या यात्रेचा मानाचा बगाड्याची निवड करण्यात आली. अजित बळवंत ननावरे यांना यंदाच्या बगाड यात्रेच्या बगाड्याचा मान प्राप्त झाला. दरम्यान, काल बगाड्याची निवड करण्यात आल्यानंतर बावधन तसेच पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थांनी हलगी तसेच तुतारीच्या निनादात सातारा येथील खा. उदयनराजेंचे निवासस्थान असलेल्या जलमंदिर पॅलेसवर जात त्यांना काशिनाथाच्या नावानं चांगभलं चा जयघोष करीत त्यांचा सत्कार केला. तसेच ग्रामस्थांच्या वतीने यात्रेला उपस्थित राहण्याबाबतचे आमंत्रण दिले.

यावेळी खा. उदयनराजेंनी ग्रामस्थांचे स्वागत केले. तसेच यात्रेला उपस्थित राहणार असल्याबाबतची ग्वाही दिली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गुजरातमधील राजकोटमध्ये इमारतीला भीषण आग
पुढील बातमी
शाहूपुरी मध्ये परप्रांतियांच्या धुडगुसाने नागरिक भयभीत

संबंधित बातम्या