सातारा : व्यक्तीच्या जीवितास धोका किंवा आरोग्यास गंभीर इजा होऊ शकणाऱ्या MEPHENTERMINE SULPHATE INJECTIONची अवैधरित्या विक्री करणाऱ्या एका इसमास सातारा स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल १,५४,०८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शिवराज पंकज कणसे (रा. अजिंक्य बाजार चौक, शाहूनगर, गोडोली, सातारा) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११८/२०२६ भा.न्या.सं. कलम १२३, १२५, २७८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बातमीदाराच्या माहितीवरून सापळा
पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथक गठित केले होते. १३ फेब्रुवारी रोजी बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार संबंधित इसम शाहू चौक ते चारभिंती मार्गावर यामाहा मोटारसायकल (MH-11-CX-6070)वरून इंजेक्शन विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने बंद पत्र्याच्या टपरीजवळ सापळा लावून संशयितास ताब्यात घेतले. अंगझडतीत त्याच्याकडे TERMIVA ब्रँडचे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IPच्या १३ बाटल्या आढळून आल्या.
बॉडी बिल्डिंगसाठी वापराची कबुली
सदर इंजेक्शन खरेदीचे बिल, डॉक्टरांची चिठ्ठी किंवा विक्री/साठवण परवाना नसल्याचे आरोपीने कबूल केले. हे इंजेक्शन बॉडी बिल्डिंगसाठी वापरले जात असून प्रत्येकी २,००० रुपयांना विक्री करत असल्याचेही त्याने सांगितले.
जप्त मुद्देमाल
इंजेक्शनच्या १३ बाटल्या – ₹४,०८०
यामाहा मोटारसायकल – ₹१,००,०००
आयफोन मोबाईल – ₹५०,०००
एकूण मुद्देमाल – ₹१,५४,०८०
या कारवाईत पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फाणे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सहभाग घेतला.
अंमली व प्रतिबंधित औषधांच्या अवैध विक्रीविरोधात पोलिसांची कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.