सातारा जिल्हा बँकेकडून राज्यातील पूरग्रस्तांना १ कोटी २२.५७ लाखांची मदत

by Team Satara Today | published on : 07 October 2025


सातारा : महाराष्ट्र राज्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ रुपयांची भरीव मदत केली आहे. सदर धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले,  मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत  बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील, उपाध्यक्षअनिल देसाई, संचालक राजेंद्र राजपुरे, प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

राज्यात उद्भवलेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक नागरिक आणि कुटुंबांचे मोठे नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आणि पुनर्वसनासाठी बँकेने केलेली मदत ही पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा हातभार लागणार असलेचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केले. 

यावेळी अजितदादा पवार म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिलेली ही भरीव मदत आहे. पूर असो वा इतर कोणतीही नैसर्गिक आपत्ती, महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या मदतीसाठी सातारा जिल्हा बँक राज्यातच नव्हे, तर देशभरात आपल्या आदर्श कार्यप्रणालीसाठी ओळखली जाते. 

बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, बॅंकिंग कामकाजाबरोबर जिल्हयातील विकासाभिमुख कामात बँक नेहमीच अग्रेसर असून महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बाधितांना मदत करण्यासाठी बँक मदतीला धावली आहे,  ही सातारा जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.

बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, सातारा जिल्हा बँकेने पूर परिस्थितीत दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून बँकेने आजपर्यंत विविध प्रकारे सर्वोतोपरी मदत केलेली आहे.

यावेळी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील म्हणाले, बँकेमार्फत रक्कम रु. १ कोटी तसेच बँक अधिकारी व सेवक यांच्या एक दिवसाची पगाराची रक्कम आणि संचालक यांचे एका सभा भत्याची अशी एकूण रक्कम रु. १ कोटी २२ लाख ५६ हजार ५९९ इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देणेत आली. सातारा जिल्हा बँक, बँकिंग कामकाजाबरोबर विकासाभिमुख कार्यात बँक नेहमीच अग्रेसर असते. बँकेने महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये ज्या-ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती आली आहे, त्या-त्या वेळी आर्थिक मदत केली आहे.

डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सामाजिक बांधिलकी केवळ आताच्या पूरग्रस्तांच्या मदतीपुरतीच मर्यादित नाही, तर बँकेने यापूर्वीही महाराष्ट्रासह संपूर्ण देशात जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेव्हा-तेव्हा आपला मदतीचा हात पुढे केला आहे. बँकेने हे सातत्याने सिद्ध केले आहे की, सातारा जिल्हा बँक केवळ एक वित्तीय संस्था नसून, समाजाप्रती जबाबदारी जपणारी आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्परतेने पुढे येणारी संस्था आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा, माण, वाई, जावली पंचायत समितीत खुल्या प्रवर्गाला संधी; अकरा पंचायत समित्यांच्या सभापतीपती पदांचे आरक्षण जाहीर
पुढील बातमी
सरन्यायाधीशांवरील हल्ल्याचा जिल्हा काँग्रेसकडून तीव्र निषेध; हे कृत्य म्हणजे न्यायव्यवस्थेवरचा हल्ला : रणजीतसिंह देशमुख

संबंधित बातम्या