महादेवाच्या दर्शनासाठी सातारमध्ये भाविकांची गर्दी

पूजा साहित्याची मागणी वाढली; उपवासाचे पदार्थ महागले

by Team Satara Today | published on : 28 July 2025


सातारा : पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त सातारा शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या महादेव मंदिरामध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. शनि शिंगणापूर येथील शंभू महादेवासह यवतेश्वर, पाटेश्वर, सातारा शहरातील कोटेश्वर, लिंब गोवे येथील कोटेश्वर अशा विविध ठिकाणी भाविकांनी महादेवाचे दर्शन घेत पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त आपली भक्तीमय सेवा महादेवाच्या चरणी अर्पण केली. यानिमित्ताने फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. 

महाराष्ट्रामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे मोठे धार्मिक महत्व असून या ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाशिवाय परिक्रमा पूर्ण होत नाही, अशी मान्यता आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव तसेच जिल्ह्यातील वेगवेगळ्या महादेव मंदिरामध्ये श्रावणी सोमवार मोठ्या उत्साहात साजरा झाला. महादेवाला अभिषेक, लघुरुद्र, मंत्र पठण, बेलफळाचे अर्पण अशा विविध पारंपारिक पूजा विधीसाठी सकाळी पाच वाजल्यापासूनच मंदिरांमध्ये गर्दी सुरू झाली होती. सातारा शहरालगतच्या पाटेश्वर आणि यवतेश्वर या दोन ठिकाणी सातारकरांनी रिमझिमत्या पावसात चालत जाऊन महादेवाला जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला. सातारा शहरातील कोटेश्वर, गणकेश्वर, बहुलेश्वर आदी मंदिरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले होते. सीसीटीव्ही च्या माध्यमातूनही गर्दी नियंत्रणाचे काम केले जात होते. सातारा शहरालगतच्या डोंगर भागातील पाटेश्वर देवस्थानामध्ये प्रचंड गर्दी होती. दक्षिणकाशी समजल्या जाणार्‍या माहुली येथील काशी विश्वेश्वर तसेच यादोगोपाळ पेठेतील काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.  भाविकांना दर्शनासाठी सर्व मंदिरे खुली ठेवण्यात आली होती. कोरेगाव तालुक्यातील चवणेश्वर डोंगरावरील महादेव मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी करुन पांढरी फुले, बेलफुल वाहण्यासाठी अखंड पायपीट केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे मंदिरात भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा होत्या. 

श्रावणी सोमवार निमित्त सातार्‍याच्या बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. पांढरी फुले आणि बेलफुले तसेच दुग्धाभिषेक करण्यासाठी सुवासिनींची बाजारपेठेत पूजा साहित्य खरेदी करता गर्दी झाली होती. श्रावण मासानिमित्त उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढली होती. वेफर्स, केळी, भगर, शेंगदाणे, साबुदाणा इत्यादी पदार्थांना मागणी वाढली. विशेषत: उपवासाची कचोरी व खिचडीला प्रचंड मागणी होती. साबुदाण्याच्या किंमती 15 टक्क्याने वाढल्याने तत्सम पदार्थ सुद्धा महागल्याने सातारकरांना ज्यादा किंमत मोजावी लागली. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा ऑपरेशन महादेवमध्ये खात्मा?
पुढील बातमी
मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी सातारा वनविभागाचा पुढाकार

संबंधित बातम्या