सत्ताधारी एका पक्षात २ गट पडले आहेत; २२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती : आदित्य ठाकरे यांचा दावा

by Team Satara Today | published on : 10 December 2025


नागपूर : सरकारमध्येच २ विरोधी पक्षनेते तयार होत नाही ना ? असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीसांना पडला असेल. विरोधी पक्षनेत्याच्या प्रस्तावात कुठलाही बदल झाला नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही बातमी कुणी पेरली, कधी पेरली, कुठच्या माणसाने पेरली हे आम्हाला माहिती आहे. पण सत्ताधारी एका पक्षात २ गट पडले आहेत. त्यापैकी एका गटातील २२ आमदार  मुख्यमंत्र्याच्या हाती लागले आहेत,  असा दावा उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी ते बोलत होते.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या वर्षभराचा अभ्यास केला तर त्या आमदारांनी सांगितलेली सगळी कामे झाली आहेत. त्यांना हवा असलेला फंड दिलेला आहे. त्याशिवाय उठ सांगितले तर उठायचे. उडी मार बोलल्यावर उडी मारायची असं ते आमदार मुख्यमंत्र्‍यांच्या इशाऱ्यावर नाचायला लागले आहेत. नेमकं कुणी यातून धसका घ्यायचा हे ज्यांनी बातमी पेरली आहे त्यांना कळेल. या २२ मधील एक जण स्वत:ला व्हाईस कॅप्टन म्हणतो असा टोलाही त्यांनी लगावला. 

तसेच काल स्वत: मुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने नागपूरात आले. त्यांचे विमान दोनदा मुंबईला गेले. तिथून इतरांना घेऊन आले. दोन्ही उपमुख्यमंत्री चार्टर्ड प्लेनने आले. आज काही आमदार चार्टर्ड प्लेनने आले. सध्या ज्या नगरपंचायत निवडणुका सुरू आहेत त्यात एक मुख्यमंत्री आणि २ बेकायदेशीर उपमुख्यमंत्री हे कुठल्या हेलिकॉप्टरने फिरतायेत? एक उपमुख्यमंत्री जे गद्दार आहेत त्यांच्या गावी जायला रस्ता नाही. २-२ हेलिकॉप्टर गावात जातात. हेलिकॉप्टरमधून ज्या बॅगा घेऊन फिरतायेत त्यात कुठला आनंदाचा शिधा आहे? ३ तासाच्या प्रचारात आनंदाचा शिधा घेऊन जातात आणि वाटतात असं सांगत आदित्य ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.दरम्यान, नाशिकमध्ये तपोवनमध्ये, ठाण्यातील मानसिक रुग्णालयाच्या परिसरातील, मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्क इथली झाडे कापायला लागलीत. देशात प्रत्येक ठिकाणी जिथं पर्यावरण वाचले आहे तिथे विकासाच्या नावाखाली झाडे कापण्याचा प्रकार सुरू आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ठिकाणी खाणी आम्ही बंद केल्या होत्या. भाजपा सरकार आल्यावर पुन्हा कामे सुरू झाली. कुठेही पर्यावरण चांगले ठेवायचे नाही. कुणी जगू शकत नाही अशी परिस्थिती करायची असाही घणाघात आदित्य ठाकरे यांनी भाजपावर केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खटाव-माण साखर कारखान्याकडून ऊसदराचा एक रकमी हप्ता जमा - माजी आमदार प्रभाकर घार्गे; ३३०० रुपये प्रति टन दराप्रमाणे बँक खात्यात वर्ग
पुढील बातमी
गोवा आग प्रकरणात मोठी कारवाई; क्लबच्या मालकाला अटक; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

संबंधित बातम्या