सातारा : जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने सातारा शहरात दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने रॅली काढून आपल्या मागण्यांचे निवेदन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना दिले. दरम्यान, रक्तदान शिबिर आणि व्याख्यानाच्या उपक्रमास जिह्यातील दिव्यांग बांधवांनी प्रतिसाद दिला. अमोल निकम, समिना शेख, अनिल ढेब यांनी उपस्थित दिव्यांगाना कसे जीवनात उभे राहायचे खचून जायचे नाही... लढायचे, असा संदेश दिला.
जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेच्यावतीने सातारा शहरातून रॅली काढण्यात आली. ही रॅली संस्थेचे अध्यक्ष अजय पवार, शहराध्यक्ष शैलेंद्र बोर्डे, प्रतापसिंहनगर विभागाचे प्रमुख बाळू ओव्हाळ, प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बगले, महिला जिल्हाध्यक्ष समिना शेख, अमोल निकम, अमोल भातुसे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कार्यकर्त्यांनी छ. शिवाजी महाराजाच्या स्मारकास अभिवादन करत पुढे रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पोहचून तेथे अभिवादन करुन राजपथ, मोती चौक, पाचशे एक पाटी, पोलीस मुख्यालय येथे पोहचली. पोलीस मुख्यालयाच्या बाहेर घोषणा देत पोलीस अधिकाऱ्यांना खाली येवून निवेदन स्वीकारण्याची विनंती केली. खाली आलेल्या अधिकाऱ्यांनी दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, त्यांच्याकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सातारा जिह्यातील दिव्यांगाना व्यवसायासाठी 200 चौरस फुट जागा द्यावी, खेडमधील दिव्यांग लतिका जगताप यांना बेघर करणाऱ्यांच्यावर कारवाई करुन त्यांना पक्के घर देण्यात यावे, केलेले आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्यात यावेत, आदी मागण्या केल्या असून त्यांचे म्हणणे ऐकून घेवून अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.
तेथून रॅली शिवतीर्थ मार्गे कार्यालयावर पोहचली. तेथे अमोल निकम, समिना शेख यांच्यासह मान्यवरांनी आपल्याला मिळालेले आयुष्य हे जरी दिव्यांग म्हणून असले तरीही ते आनंदी व्यथीत करण्यासाठी रडून, दुखी कष्टी न होता. ते लढून जिद्दीने त्यावर मात करुन पुढे जायचे. आपण जन्माने दिव्यांग असलो, आपल्याला मरण येतानाही दिव्यांग म्हणून येणार आहे. परंतु आयुष्य हे सक्षम असल्यासारखेच जगायचे. आयुष्य जगताना सकारात्मक विचार करुन आपल्या संकटांवर मात करत पुढची वाट चोखळायची आहे, असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, अजय पवार यांनी आभार मानले.