सातारा : शाहूनगर येथील एकनाथ रेसिडेन्सीच्या पार्कमध्ये आढळलेल्या बिबट्याच्या पिल्लाचे पुनर्वसन करण्यासाठी सातारा वनविभागाने पिल्लाला बावधन पुणे येथील रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवले आहे. तेथे बिबट्याच्या पिल्लाची वर्षभर काळजी घेतली जाणार आहे.
वनविभागाच्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या पथकाने थर्मल ड्रोन उडवून बिबट मादीचा मागवा घेण्याचे काम सुरूच ठेवले आहे. शाहूनगर परिसरामध्ये बिबट्याचा वाढता वावर हा येथील नागरिकांच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे. आठवडाभरापूर्वी बिबट्याच्या मादीने दोन पिल्ले शाहूनगर गुरुकुल शाळेजवळील एकनाथ रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये सोडून तेथून ती निघून गेली होती. सातारा वन विभागाने ही पिल्ले ताब्यात घेऊन पुन्हा मादी व पिल्ले यांची भेट घडवण्याच्या दृष्टीने जोरदार प्रयत्न केले. त्यातील एक पिल्लू मादी घेऊन गेली मात्र एक पिल्लू तसेच राहिल्याने त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते व सातारा वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांनी बावधन पुणे येथील रेस्क्यू नावाच्या सामाजिक संस्थेमध्ये या पिल्लाला दाखल केले आहे. येथे या पिल्लाची पूर्णतः काळजी घेतली जाणार आहे. ना नफा ना तोटा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या या केंद्रांमध्ये मार्जार कुळातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जाते. बिबट्याचा शारीरिक विकास आणि त्याचा नैसर्गिक अधिवास या दृष्टीने त्याची काळजी घेतली जाणार आहे.
थर्मल ड्रोन घेणार बिबट मादीचा शोध
सातारा वनविभागाने थर्मल ड्रोन च्या माध्यमातून बिबट मादीचा शोध घेण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू ठेवला आहे. तब्बल आठ दिवस या ड्रोन च्या माध्यमातून परिभ्रमण मार्गाच्या दिशेने ड्रोन उडवला जात असून जास्तीत जास्त घनदाट वनक्षेत्रामध्ये खोलवर मागोवा घेत आहे. ड्रोनचा जीपीएस तसेच उच्च दर्जाचे लेन्स कॅमेरे अजिंक्यतारा किल्ल्याच्या उतारावरील वनक्षेत्राचे वेगवेगळ्या अँगलने फोटो घेत आहे. शाहूनगर च्या बाजूने ड्रोनने शोध मोहीम पूर्ण केल्यानंतर आता सातारा शहराच्या दिशेने अर्थातच स्मृतीवन उद्यानाच्या बाजूने पुन्हा एकदा ड्रोन उडवला जाणार आहे.
द्रावणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर
सातारा वनविभागाने पुन्हा बिबट्या या परिभ्रमण मार्गावरून येऊ नये याकरता विशिष्ट रसायनाचे एनिमल आउट द्रावण फवारण्यात आले आहे आणि त्याचा परिणाम सुद्धा आढळून येत आहे. हे द्रावण विशिष्ट तीव्र गंधाचे असल्यामुळे बिबट्या या मार्गाने येण्यास तयार होत नाही. सध्या या द्रावणाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यात आलेला आहे. बिबट प्रवण क्षेत्रामध्ये विशेषता कराड व पाटण तालुक्यातील दीडशे गावांमध्ये हे द्रावण वापरले जाणार असल्याची वनविभागाच्या सूत्रांची माहिती आहे.