सातारा : लाडकी बहीण योजनेतून महिन्याला २१०० रुपये देण्याची घोषण अर्थसंकल्पातून होईल, अशी अपेक्षा ठेवून बसलेल्या कोट्यवधी लाडक्या बहिणींची सरकारमध्ये बसलेल्या दोडक्या भावांनी निराशा केली आहे. जवळपास १० लाख भगिनींना योजनेतून वगळण्यात आले आहे. राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, महिला आणि सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा आहे. कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला हा 'पोकळ अर्थसंकल्प' असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केली.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, महायुती सरकारचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असून कधीही असा निराशजनक व तुटीचा अर्थसंकल्प राज्यात सादर झाला नव्हता. या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला समाधान दिले असे दाखवावे. महायुती सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काही तरी योजना दिल्या जातील, असे वाटले होते पण तशा काही योजना सरकारने केल्या नाहीत. वीज माफीचा विषय सोडला तर कोणत्याही प्रकारचे आश्वासन सरकारने पूर्ण केले नाही. उद्योगधंदे वाढवले असे सांगण्यात आले, परंतु उद्योगवाढ झालेली पहायला मिळाले नाही आणि मुद्रांक शुल्क जे माफ केले ते उद्योग धंद्यासाठी केले असून यासाठी एकाच व्यक्तीचा विचार केला. सर्वसामान्य माणसासाठी या अर्थसंकल्पात तरतूद नाही. वाहनांवर, मुद्रांक शुल्कावर कर आकारून मध्यमवर्गीयांना आर्थिक फटका देण्यात आला आहे. असे चित्र संपूर्ण महाराष्ट्राला आज दिसत आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
आताचा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असून कधीही असा निराशजानक व तुटीचा अर्थसंकल्प राज्यात सादर झाला नव्हता. या अर्थसंकल्पात कोणत्या घटकाला समाधान दिले हे दाखवावे. सुमारे ३५ हजार कोटी रुपये लाडकी बहीण योजनेसाठी तरतूद केली. सामाजिक न्याय, मागासवर्गीय विभाग आणि आदिवासी विभाग सोडला तर प्रत्येक खात्यात कट मारलेला या अर्थसंकल्पात दिसतो आणि प्रत्येक ठिकाणी कट मारला तर राज्याचा विकास कसा होणार, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.