भिवंडी येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा १७ मार्च लोकार्पण सोहळा

by Team Satara Today | published on : 14 March 2025


मुंबई : स्वराज्य हिंदवी संस्थापक दैवत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य आहे. आपल्या असीम शौर्याने जगाच्या इतिहासामध्ये गौरवशाली पाने जोडणाऱ्या छत्रपती शिवरायांचे भिवंडीमध्ये पहिले मंदिर उभारण्यात आले आहे. भिवंडी येथील मराडेपाडा येथे हे भव्य मंदिर साकारण्यात आले असून सर्व शिवभक्तांसाठी ही एक आदरणीय वास्तू असणार आहे. पहिल्याच साकारण्यात आलेल्या या मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या 17 मार्च रोजी करण्यात येणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळा हा तिथीप्रमाणे येत्या 17 मार्च रोजी राज्यभरामध्ये साजरा केला जाणार आहे. याच निमित्ताने भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मंदिराचे लोकार्पण देखील केले जाणार आहे. शिवक्रांती प्रतिष्ठानचे प्रमुख राजु चौधरी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमातून तब्बल सात वर्षांच्या प्रयत्नातून हे विशाल मंदिर साकारले आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा चार दिवसाच्या शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठपणा सोहळ्याच्या धार्मिक विधीनुसार आयोजित कार्यक्रमाने तिथीनुसार साजरा होणार आहे.

शिवजन्म सोहळा हा फक्त देशभरातच नव्हे तर विदेशाताही मोठ्या भक्तीभावाने वीररसात संपन्न होत असतो. 350 वर्षानंतरही शिवरायांनी साकारलेले सह्याद्रीच्या कुशीतील गडकिल्ले आणि समुद्री गड किल्ले तसेच शिवरायांच्या रयतेच्या कल्याणमय स्वराज्याचे अनेक पैलू आजच्या नव्या पिढीसमोर येत असल्याचा आनंद सोहळा लोकांना कायम पहायला मिळणार आहे. गड किल्ल्यांबरोबरच आता भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर त्यांच्या जाज्वंल इतिहासाची ग्वाही देणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने व काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आला आहे. या सर्व मंदिराची रूपरेखा ह.भ.प डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अभियंता व वास्तुविशारद विजयकुमार पाटील भिवंडी यांनी केली आहे. हे मंदीर हुबेहुब गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज, महाद्वार आहे. तसेच मंदिर प्रवेशद्वार उंची ४२ फूट असून एकूण पाच कळस, गाभाऱ्यावर ४२ फूट सभा मंडप, सभा भोवती चार कोपऱ्यावर गोलाकार बुरुज, टेहळणी मार्ग हे सर्व प्रत्यक्ष दगडाच्या तोडी घडवून उभारणी करण्यात आली आहे. तटबंदीच्या आत ३६ विभाग असून त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून इतिहास दर्शन घडविण्यात येणार आहे. सर्व खांब कोरीव, महिरपी कमानी आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साडे सहा फूट असून ती अयोध्यातील रामाची मूर्ती घडविणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यातील दिव्यांग विशेष शाळातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न

संबंधित बातम्या