सातारा : अमेरिकेतील इलेक्ट्रिक कार उत्पादनात अग्रेसर असणारी टेस्ला ही कंपनी भारतात येवू पाहत आहे. मात्र, हैद्राबाद स्थित मेघा इंजिनिअरिंग सोबत वाटाघाटी फिस्कटल्यानंतर या कंपनीने थेट महाराष्ट्राचा रस्ता धरला आणि तोही सातारा जिल्ह्याचा. त्यामुळे काही दशकांपासून निपचित पडलेल्या औद्योगिकीकरणाला यानिमित्ताने बळ मिळाले आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे सातारकरांनीही टेस्ला हवी पण उशाला, खंडाळा-शिरवळ कशाला? असा सूर पुन्हा आळवला आहे.
11 मे रोजी भारतातील प्रतिष्ठित आर्थिक दैनिक बिझनेस स्टॅण्डर्ड ने टेस्ला मेघा इंजिनिअरिंग संयुक्त उपक्रम फिसकटला. टेस्ला कंपनी महाराष्ट्राच्या दिशेने, असे वृत्त प्रकाशित केल्याने महाराष्ट्रातील अनेक बेरोजगार युवकांच्या आशा पल्लवित झाल्या. असे असतानाच गेल्या दोन दिवसांमध्ये टेस्ला कंपनी पुण्या जवळील चाकण व चिखली येथील दिल्या जात असलेल्या जमिनीबद्दल उत्सुक नसल्याने या कंपनीने आपला मोर्चा सातारा जिल्ह्याकडे वळवला आहे. चाकण आणि चिखली हे भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल हब पैकी एक आहे. मात्र, ही दोन्ही ठिकाणे ओव्हर क्राऊडेड म्हणजेच लोकसंख्येच्या आणि ट्राफिकच्या समस्येने वेढलेली असल्याने सातारा हे टेस्ला कंपनीच्यादृष्टीने तसेच चांगल्या पायाभूत सुविधा तसेच स्थानिक ऍटो कंपोनंट कंपन्यांमुळे त्यांना सोयीचे ठरणार आहे.
टेस्ला कंपनी 100 टक्के याठिकाणी या कारचे उत्पादन करणार नसली तरी सिकेडी म्हणजेच कंप्लीटली नॉक्ड डाऊन असेंब्ली युनिटसाठी शिरवळ आणि खंडाळा परिसरामध्ये जागा शोधत असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांमध्ये ऐकावयास मिळत आहेत. शिरवळमधील औद्योगिक टप्पा क्र. 3 मध्ये अंदाजे 750 एकर जागा टेस्ला कंपनीच्या अधिकार्यांनी पाहिली असल्याची चर्चा या परिसरामध्ये होत आहेत. परंतू याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा औद्योगिक महामंडळाच्यावतीने करण्यात आलेली नाही. असे असतानाच टेस्ला चा येऊ घातलेला हा प्रकल्प शिरवळ-खंडाळा ऐवजी सातारा शहराच्याच पंधरा ते वीस किलोमीटरच्या परिघामध्ये उभा करण्यात यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
साधारणत: 20-25 वर्षांपूर्वी सातारा एमआयडीसीतील मोठमोठ्या कंपन्या दुसर्या ठिकाणी स्थलांतरित झाल्या किंवा बंद पडलेल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र स्कूटर्स, ऍरिस्टोक्रॅट, फतेजा, ट्यूबर्ग आणि इतर छोट्या-मोठ्यांची गणतीच नाही. त्यामुळेच सातारा शहरासह तालुक्यातील लगतच्या जावली, कोरेगाव, कराड, पाटण तालुक्यांतील बेरोजगारांना रोजगारासाठी पुण्या-मुंबईची वाट धरावी लागत आहे. शिरवळ-खंडाळा हे जरी जिल्ह्यात असले तरी त्यापेक्षा पुणे वाईट काय, असा प्रश्नही अनेकजण करीत आहेत. चाकण सह पुण्यातील इतर एमआयडीसीतील कंपन्यांचे परिसर अतिरिक्त लोकसंख्येमुळे तसेच वाहतुकीच्या जटीलतेमुळे नवीन येऊ घातलेल्या कंपन्यांच्यादृष्टीने सोयीचे नसल्याने पुण्यातील बहुसंख्य कंपन्यांनी आपला मोर्चा जवळच असणार्या शिरवळ-खंडाळाकडे वळवला आहे. मात्र, शिरवळ-खंडाळा हे जिल्ह्यात असले तरी त्याचा काहीएक फायदा सातारा शहराला होत नसल्याने अनेकांनी टेस्ला ही जगविख्यात येऊ घातलेली कंपनी सातारा जिल्ह्यात म्हणजे सातारा शहरालगतच उभारण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून सातारा येथील आयटी पार्कचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याची माहिती मिळत आहे. परंतू या सर्व पार्श्वभूमीवर टेस्ला कंपनीच्या निमित्ताने दुग्धशर्करा योग जुळून आला आहे. शिरवळ-खंडाळा तसेच फलटण तालुक्यामध्ये येऊ घातलेल्या कंपनीसाठी शेकडो एकर जागा उपलब्ध आहे. तसेच दळणवळणाच्या दृष्टीनेही ही ठिकाणे कंपन्यांच्यादृष्टीने सोयीची आहेत. मात्र, सातारा शहरालगत टेस्ला कंपनीसाठी लागणारी शेकडो एकर जागा उपलब्ध करणे, हे मोठ्या कसोटीचे काम आहे. यासाठी स्थानिक आमदार-खासदारांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत.
संधीचे सोने केले तरच येणार्या पिढ्याही ज्यांनी-ज्यांनी ही जगविख्यात कंपनी सातार्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, त्याचे गोडवे गाणार आहेत. नाहीतर नेहमीप्रमाणेच जाने भी दो यारों म्हणत आपलीच पाठ थोपटून घेणार आहेत. टेस्ला हवी पण उशाला, खंडाळा-शिरवळ कशाला? असा प्रश्नही जोर धरु लागला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक खासदार-आमदारांची प्रतिष्ठा मात्र यानिमित्ताने पणाला लागणार आहे. टेस्ला येते, की जाते, हे मात्र येणार्या काळातच बघायला मिळणार आहे.