09:41pm | Nov 24, 2022 |
सातारा : बोगस सैन्य भरती प्रकरणातील महाठग आकाश डांगे याच्या मुसक्या सांगली पोलिसांनी चार दिवसांत आवळल्या. चारच दिवसांत सांगली पोलिसांनी महाठग आकाश डांगेच्या मुसक्या आवळण्याचे धैर्य दाखवले. मात्र, चार वर्षात आकाश डांगेच्या विरोधात तक्रारी येवूनही सातारा पोलिसांनी मात्र ओरबाडलेले हात पृष्ठभागाला पुसून आपली निष्क्रीयता दाखवून दिली. परंतू सांगली पोलिसांनी मात्र आकाश डांगेच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चारच दिवसांत त्याची मोळी केली. जे सातारा पोलिसांना चार वर्षात जमले नाही, ते मात्र सांगली पोलिसांनी चारच दिवसांत करुन दाखवले.
गेल्या चार-पाच वर्षात फलटण तालुका बोगस सैन्य भरतीचे हब बनलेले आहे. कुणीही या, भरतीपूर्व प्रशिक्षण संस्था उभारा. ऍकॅडमीच्या गोंडस नावाखाली सैन्य दलात तुमचं पोरगं शंभर टक्के भरती करुन दाखवू, अशी अमिषे दाखवून अनेक अकॅडमीवाल्यांनी खोर्याने पैसा ओढला. गुन्हे दाखल होतात. न्यायालयीन सोपस्कार पार पडल्यानंतर ते पोलिसांशी चार भिंतीच्या आतील तडजोडीनंतर जामिनावर बाहेर पडतात. पुन्हा तेच उद्योग सुरु. फलटण तालुक्यात किंबहुना जिल्ह्यामध्ये सगळीकडे याच भानगडी सुरु आहेत.
सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यामध्ये सैन्य दलाच्या परीक्षांचे पेपरफुटी प्रकरण चव्हाट्यावर आले होते. यामध्ये फलटण तालुक्यातील काही महाठगांचाही समावेश होता. पुणे शहर गुन्हे शाखेने यासंदर्भात लष्करातील एका अतीवरीष्ठ अधिकार्यासह सातार्यातील काहीजणांवर गुन्हे दाखल केले होते. यथावकाश याही प्रकरणातील भानगडबाज सहीसलामत बाहेर आले. ‘पुन्हा येरे माझ्या मागल्या’ प्रमाणे त्यांचे पुन्हा ‘तेच’ सुरु आहे. एकूणच देशाचा कणा समजल्या जाणार्या सैन्यदलात भरती होवू इच्छिणार्या काही टग्यांना मागच्या दाराने सैन्य दलात भरती करण्याचा घाट हेच अकॅडमीवाले काही पैशांच्या मोबदल्यात करतात. ‘पट भी मेरी, चित भी मेरी’ याप्रमाणे जो भरती होईल त्याला लॉटरी, जो नाही होणार त्याला बाटली, असे कामकाज सध्या सुरु आहे. सातारा पोलिसांना हे सर्व ज्ञात आहे. परंतू यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर ज्या शासनाचा आपण पगार खातो, त्या शासनासह नागरिकांचे आपण देणे लागतो, याचे भान न राहिल्याने सातारा पोलिसांची विश्वासार्हता पणाला लागली आहे.
जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांना भारतीय नौदलासह इतर दलांमध्ये भरती करण्याचे आमिष दाखवून आकाश काशिनाथ डांगे रा. भाडळी बुद्रुक, ता. फलटण या युवकाने तिशीच्या आतच हजारो युवकांना कात्रजचा घाट दाखवलेला आहे. विशेष म्हणजे इतर अकॅडमीवाल्यांपेक्षा आकाश डांगेने वेगळाच फंडा वापरला. थेट त्याने नौदल अधिकार्याचीच वर्दी चढवली आणि त्यानुसार मी नौदलातील अधिकारी आहे, असे भासवून त्याने हजारो युवकांना लाखो रुपयांच्या मोबदल्यात नियुक्तीपत्रांची खैरात वाटली. या ठगीतून आकाश डांगेने कोट्यवधी कमवले आणि त्याने हा पराक्रम तिशीच्या आतच उरकला. सुमारे चार वर्षापूर्वी आकाश डांगेच्या भानगडी चव्हाट्यावर आल्यानंतर ‘सातारा टुडे’ने त्याला निरमा पावडर लावून धु धू धुतला. अखेर हाच फेस जिल्ह्यासह राज्यभरात पसरला. आकाश डांगेच्या विरोधात तक्रार करण्यास न धजावणारे युवकही आकाश डांगेविरोधात तक्रार देण्यास पुढे आले. ही ठोकाठोकी आणि धुवाधुवी ऐन लॉकडाऊनमध्ये सुरु होती. ‘सातारा टुडे’ची सडेतोड बातमी वाचून राज्यातील अनेक युवकांची भीड चेपली. अनेकांनी फलटणचा रस्ता धरला. शेकडो युवक फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पायर्या चढू लागले. परंतू आकाश डांगेने आधीच ‘सेटिंग’ करुन ठेवलेली. गंडवलेली पोरं जावून जावून कुठं जाणार? पोलीस ठाण्यापर्यंतच ना? मग या पठ्ठ्याने दोन्ही पोलीस ठाणीच मॅनेज केलेली. दोन्ही पोलीस ठाण्यातील हवालदारापासून पोलीस निरीक्षकांपर्यंतचे अधिकारी डांगेने मिंधे करुन ठेवलेले. त्याच्या विरोधात तक्रारअर्ज आला की टाक डस्टबीन मध्ये. एखादा आडगा लागलाच तर बसून बोलू, अशी ऑफर त्या पीडित युवकाला चक्क पोलीसच द्यायचे. मग पोलीस ठाण्यातील अधिकारी फलटणातील कोणतेतरी हॉटेल गाठून आकाश डांगेची त्या पीडित युवकाबरोबर बैठक लावून द्यायचे. पाच लाख दिलेत ना? हे दोन लाख घे आणि चल सटक, गुन्हा दाखल केला आणि हे प्रकरण कोर्टात गेले तर दमडीही मिळणार नाही, असा दम चक्क पोलीसच त्या पीडित युवकाला भरायचे. चोर नाही, चोराची लंगोटी असे म्हणत ते युवक पाय आपटतच फलटणचा निरोप घ्यायचे. या आणि अशा कितीतरी भानगडी अनेक दिवस सुरु होत्या. पण डांगे आणि त्याच्या पोलीस मित्रांची टोळी ‘सातारा टुडे’च्या रडारावर आली. नेहमीप्रमाणे ‘सातारा टुडे’ने डांगेसह त्याच्या साथीदार पोलीस मित्रांनाही भाजून काढले. तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांनी याची गंभीर दखल घेत संबंधित अधिकार्यांसह कर्मचार्यांना थेट घरचा रस्ता दाखवला. गंडवून कमविलेल्या पैशाच्या कैफात लोळणार्या डांगेला ‘सातारा टुडे’चा हा पहिला झटका होता. त्यानंतर त्याला झटक्यावर झटके मिळत राहिले. बरोबर दोन वर्षापूर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल केला आणि फलटणात बसून गोरगरीब युवकांची ठगी करणारा डांगे राज्यातील पोलिसांसह मिलिटरी इन्टिलिजन्स च्या रडारावर आला.
सुरवातीलाच डांगेचे नौदलातील काही वरिष्ठ अधिकार्यांचे सूत जुळले होते. पुण्यातील एनडीए सह लोणावळ्यातील आयएनएस शिवाजी मध्येही आकाश डांगेचा वावर असायचा. सैन्य दलात भरती होवू इच्छिणार्या काही युवकांची सैरही तेथून घडवून आणली होती. एकवेळ रंग बदलण्यात सरडा फेल होईल, पण आकाश डांगे मात्र रंग बदलण्यात पटाईत झाला होता. भारतीय लष्कर, नौदलातील वरिष्ठ दर्जाच्या अधिकार्यांचे हुबेहुब ड्रेस घालून डांगेने सातार्यातील भल्याभल्यांना गंडवले होते. ‘मी नौदलातील अधिकारी’ असे भासवून डांगेने राज्यातील अनेक राजपत्रित अधिकार्यांकडून पाहुणचारही झोडलेला होता. परंतू शेवटी पापाचा घडा भरतोच. डांगेचाही घडा भरला. ‘सातारा टुडे’ने डांगेने केलेल्या भानगडींचा लेखाजोखा मांडायला सुरुवात केल्यानंतर तक्रारदारांचा ओघ वाढला.
सहा दिवसांपूर्वी सांगलीतील युवकांच्या फसवणूक प्रकरणी आष्टा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. लागलीच चार दिवसांतच त्याची पुण्यातून मोळी बांधून त्याची उचलबांगडी केली. यावेळी मात्र पोलिसांना मुद्देमालात घबाडच सापडले. काही युवकांबरोबर केलेल्या नोटर्या, सैन्यदलाची बनावट नियुक्तीपत्रे, शिक्के, नौदल अधिकार्याचा गणवेश या आणि अशा बर्याच भानगडी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. लॅपटॉप, मोबाईलमधून मिळालेल्या डाटाच्या माध्यमातून केलेल्या भानगडी बाहेर येण्यास मदत होणार आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर परवा त्याने कस्टडीतच आत्महत्त्या करण्याचा फार्स केला. कुठेतरी पडलेले ब्लेड हातावर मारुन, कस्टडीत मिळणार्या हाग्या माराला घाबरुन हे कृत्य केल्याचे जाणकारांनी सांगितले. या प्रकरणात सकृतदर्शनी डांगे एकटाच दिसत असला तरी डांगेची एक टोळी आहे आणि ही टोळी मिळून काम करते. येत्या दिवसांत या टोळक्यातील एकेकाचा ‘सातारा टुडे’ करेक्ट कार्यक्रम करणार आहे. सध्या तरी डांगेची 'गाठ' सांगली पोलिसांशी पडलेली आहे. सातारा पोलिसांनी आजपर्यंत आकाश डांगेला पाठिशी घालून राज्यातील हजारो पीडित युवकांचा तळतळाट घेतला. पण सांगली पोलिसांनी मात्र सगळे काही पैशात तोलायचं नसतं, हे दाखवून दिले आहे.
सातारा हा सैनिकांचा जिल्हा आहे. प्रथम विश्वयुद्धापासून अगदी कारगिलपर्यंत आणि अलिकडे कश्मीरसह इतर भागात होणार्या चकमकींमध्ये छातीचा कोट करुन या भारत भू चे रक्षण करताना सातारच्या भूमीतील अनेक जण हुतात्मा झाले. परंतू आकाश डांगेसारख्या ठगांना या भावना कळणार्या नाहीत. पैशापुढे आम्ही मातीच काय, शेणही खावू शकतो, हे दाखवून दिलेले आहे. भविष्यात पैसे मिळत असतील तर दहशतवाद्यांनाही पैशांसाठी जावून मिळणारी ही औलाद वेळीच ठेचली पाहिजे.
आकाश डांगे सध्या त्याने केलेल्या कुकर्मामुळेच पुरता अडकलेला आहे. पीडित युवकांनी आता न घाबरता समोर यायची वेळ आलेली आहे. सातारा पोलिसांनी जे झालं, ते गंगेला मिळालं, असे म्हणत आकाश डांगेविरोधात ताबडतोब मोर्चा उघडायला पाहिजे.
त्या चौकडीच्याही मुसक्या आवळा!
गेल्या पाच-सहा वर्षामध्ये आकाश डांगेने बोगस सैन्य भरतीतून मिळालेल्या पैशातून फलटण तालुक्यासह पुण्यात नंगानाच चालविलेला आहे. मिळालेल्या पैशाच्या जोरावर खासगी सावकारी, अवैध वाळूउपसा तसेच अनेक अवैध व्यवसायांमध्ये शिरकाव केला. जैसा देस वैसा भेस, असे म्हणत अनेक बहुरुपी आकाश डांगेला येवून मिळाले. फलटणातील काही बोगस पत्रकार, चोर्या चपाट्या करणारे अनेक पंटर आकाश डांगेच्या मागे-पुढे करु लागले. हाड म्हटल्यानंतर कुत्रंही हाडुक टाकून धूम ठोकते. परंतू दारु डोक्यात गेल्यानंतर आकाश डांगेने बध्या मार दिला तरी ही चौकडी पुन्हा गोंडा घोळत आकाश डांगेच्या पायाशी लोळण घालते. आकाश डांगेने ज्या काही भानगडी केल्यात, त्या भानगडीत ही चौकडीही तितकीच भागीदार आहे. भविष्यात एखादा मोठा कांड जर थांबवायचा असेल तर सातारा पोलिसांनी वेळीच त्या चौकडीच्याही नांग्या ठेचाव्यात, अशी मागणी डांगे पीडित युवकांनी केलेली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |