'परवा म्हणजेच 5 डिसेंबर रोजी जगभरात महायोगी अरविंद अर्थात अरबिंदो यांची पुण्यतिथी साजरी झाली. आयसीएस ही ब्रिटीश काळातील सनदी अधिकारी होण्यासाठी द्यावी लागणारी परीक्षा देण्यासाठी योगी अरविंद म्हणजेच अरबिंदो घोष यांना वयाच्या सातव्या वर्षीच इंग्लंडला पाठविण्यात आले होते. त्या काळात एवढ्या लहान वयात परदेशात पाठविले गेलेले हे एकमेव भारतीय व्यक्तिमत्व. घरात सात पिढ्या जगून निघतील एवढे ऐश्वर्य असतानाही योगी अरविंद अध्यात्माकडे वळले. अध्यात्मामुळे त्यांना दिव्यत्वाची प्रचिती आली. परंतू ऐन तारुण्यामध्ये दक्षिण पूर्व भारतातील फ्रेंचांची वसाहत असलेल्या पॉंडेचेरीमध्ये ते विसावले आणि तिथेच त्यांनी शेवटचा श्वास घेतला. आज पॉंडेचेरी आणि तमिळनाडू सीमेवर विलुपुरम जिल्ह्यामध्ये ओरोविल या नवीन जगाने आकार घेतलाय... 1968 साली या वेगळ्या जगाने आकार घ्यायला सुरवात केली. आज ते पूर्ण स्वरुपात उभे आहे. फ्रेंच विदुषी असलेल्या मिरा अल्फासा उर्फ श्री माताजींनी याची स्थापना केली. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ यादीमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे. ऑरोविले म्हणजे एक वैश्विक नगरी आहे. यामध्ये जात-पात-पंथाला थारा नाही. या ओरोविलमध्ये जवळपास सर्वच देशातील नागरिक शांती व प्रगतशील सुसंवादाने आपले दिनमान व्यतित करीत आहेत. मानवी एकता प्रत्यक्षात जीवनमानात उतरवणे हा ऑरोविलेचा हेतू होता आणि आहे. आज याठिकाणी 59 देशांमधील सुमारे 3000 पेक्षा अधिक लोक येथे वास्तव्यास आहेत. , योगी अरविंद आणि माताजी अर्थात मिरा अल्फासा यांविषयी का लिहित आहे, याला एक कारण आहे. गेल्या काही वर्षापासून पॉंडेचेरी हे माझ्या विसाव्याचे हक्काचे स्थान झाले आहे. खरेतर महाराष्ट्रातील महानुभवांचा वावर हा उत्तरेत जास्त असतो. दक्षिणेत तसा तो कमीच. भाषा, संस्कृती हे त्यामागील काही कारण असावे. वर्षातून किमान दोन-तीनदा तेथे जाणे होते. फ्रेंचांची जुनी वसाहत आणि काही समुद्र किनारे सोडल्यास पॉंडीमध्ये पाहण्यासारखे असे जास्त काही नाही. आपण नेहमीच गोव्याची आणि पॉंडीची तुलना करतो. मात्र ती तुलना होवू शकत नाही. गोव्यात पोतुर्गिजांनी आणि पॉंडेचेरीमध्ये फ्रेंचांनी जवळपास सारखेच राज्य केले. परंतू गोव्यातील तसेच आसपासच्या भागातील तत्कालीन नागरिकांनी ज्या पद्धतीने पोतुर्गिज कल्चर आत्मसात केले, त्याला मात्र पॉंडेचेरीकर अपवाद ठरले असावेत. कारण, येथील लोकांची हजारो वर्षे जुन्या असलेल्या तमिळ संस्कृतीची नाळ घट्ट असावी. असो, पॉंडीत असल्यानंतर ओरोविलचा फेरफटका ठरलेलाच.ओरोविलमधील मात्री मंदिर अर्थात मातृ मंदिर हे विशेष आकर्षण. अनेकदा पाहिल्यानंतरही मन न भरुन येण्यासारखे हे स्थळ. हजारो बनयान-ट्री अर्थात वटवृक्षांच्या गळ्यात गळे घालणार्या श्रृंखला याच ठिकाणी पहाव्यात. हजारो वर्षे उभे असलेले हे वृक्ष एकात्मतेची आठवण करुन देतात. या मात्री मंदिरात प्रवेश केल्यानंतर दिव्यत्वाची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. ज्याचा अध्यात्मात्वावर गाढा विश्वास आहे, तो येथून कधीच काढता पाय घेणार नाही. असे हे ठिकाण. योगी अरविंद तसे कोणाच्याही खिजगणतीत नसलेले व्यक्तिमत्व, अशी अनेकांची धारणा आहे. सुमारे वीस वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या मुखातून एका व्याख्यानावेळी योगी अरविंद हे नाव कानावर पडले. योगी अरविंद हे न शालेय अभ्यासात होते, न कधी वाचनात आले. परंतू भोसले सरांच्या ओघवत्या वाणीने योगी अरविंदांचे अनेक पट जिवंत झाले. आणि निश्चितच तेव्हापासून या व्यक्तिमत्वाबाबत एक वेगळे आकर्षण निर्माण झाले. प्रा. भोसले सरांच्या जिव्हेवर साक्षात सरस्वती वास करायची. या माणसाने वेगवेगळ्या विषयांवर राज्यात आणि देशात हजारो व्याख्याने दिली. त्यामध्ये स्वामी विवेकानंद आणि योगी अरविंद हे त्यांच्या व्याख्यानांमधील आवडीचे विषय. या दोघांच्यावर ते तासन्तास विवेचन करायचे. समोरचा श्रोता भले जरी तो परिवर्तनवादी असला तरी तो प्रा. भोसले यांच्या अमोघ वाणीने मंत्रमुग्ध व्हायचा. नकळत तोही त्या या दोन्ही विभुतींच्या प्रेमात पडायचा. माझा आणि भोसले सरांचा प्रत्यक्षात संबंध आला तो 17-18 वर्षांपूर्वी. एका दैनिकात काम करीत असताना त्या दैनिकात छापुन आलेले लेख कौतुकाने त्यांना दाखवायचो. लिहित चल, म्हणायचे. योगायोगाने मीही फलटणचा आणि तेही निवृत्तीनंतर फलटणमध्ये स्थायिक झालेले. कुलगुरु होण्याआधी त्यांनी फलटणमधील मुधोजी महाविद्यालयात अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले. किंबहुना त्या महाविद्यालयाची स्थापनाही त्यांच्याच कारकिर्दीत झाली असावी. प्रा. भोसले हे उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांच्याशी तासन्तास बोलावे, अशी त्यांना जाणणार्यांची इच्छा असे. त्याबाबत मी सुदैवी ठरलो. त्यांच्याशी बोलत असताना योगी अरविंद नेमके तुम्हाला कोठे गवसले? असे विचारले. त्यावेळेस त्यांनी सांगितले, पुण्यात बी.ए. च्या वर्गात शिकत असताना योगी अरविंदांच्या निधनाची वार्ता त्या काळात प्रकाशित होत असलेल्या टाईम्स ऑफ इंडियामध्ये छापून आली होती. 1950 सालची ही घटना. योगी अरविंदांचे निधन होवून शंभर तास उलटले तरी त्यांचा मृतदेह हा जिवंत व्यक्तिप्रमाणे तेजपुंज दिसत होता. इतर मृतदेह मृत्यूनंतर काही तासांतच विघटन होवून ते निस्तेज पावतात. परंतू योगींच्याबाबत मात्र उलटे झाले होते. चक्क याची मोठ्या दैनिकांनीही दखल घेतली होती. कदाचित यामुळेच मी व माझे मित्र योगीकडे आकृष्ठ झालो. त्यांच्यासंदर्भात उपलब्ध असणारे जे मिळेल ते साहित्य वाचून काढले आणि तोच माझ्या उत्तरार्धातील विवेचनाचा विषय ठरला. अतीशय संपन्न अशा बंगाली कुटूंबात जन्म झालेल्या योगींना पितृ हट्टामुळे अवघ्या सातव्या वर्षी देश सोडावा लागला. त्यांना इंग्लंडमधील मँचेस्टरमध्ये बोटीने पाठविण्यात आले. सातव्या वर्षी मुलांना घराजवळील शाळेत पाठविताना अनेक पालकांना छातीवर दगड ठेवावा लागतो. परंतू असे असताना योगींच्या पालकांनी मुलांनी मोठे व्हावे, मोठ्या पदावर जावे या महत्वकांक्षेपोटी आपल्या मुलाला साता समुद्रापलिकडे पाठवून दिले, हे एकप्रकारचे धाडसच म्हणावे लागेल. परंतू विलायतेत शिक्षण सुरु असताना त्यांचे मन मात्र भारत देशातच होते. त्या काळात मानाची समजली जाणारी व भारतात सनदी अधिकारी होण्यासाठी गरजेची असलेली आयसीएस ही परीक्षा ते त्या काळी उत्तीर्ण झाले. भारतात येवून ते निश्चितच सनदी अधिकारी बनले असते, परंतू त्यांनी तसे केले नाही. सुमारे 14 वर्षे इंग्लंडमध्ये राहिल्यानंतर ते भारतात आले. परंतू ज्या बोटीने ते भारतात येणार होते, ती बोट लाटेच्या तडाख्यात समुद्राने गिळंकृत केली. त्या काळामध्ये टेलिफोनची व्यवस्था नव्हती. तारेनेच कुटूंबियांनी ही घटना बोट कंपनी व्यवस्थापनाने कळविली. ही तार कळताच योगी अरविंदांच्या वडिलांनी जागेवरच प्राण सोडले. वास्तविक जी बोट बुडाली होती, ती बोट काही कारणांमुळे योगी धरु शकले नाहीत. त्यामुळे त्यांचा जीव वाचला. त्यानंतर काही महिन्यांनंतर ते दुसर्या बोटीने ते भारतात आले. वडील निर्वतल्याची वार्ता त्यांना भारतात पाय ठेवताच समजली. ज्यांच्यासाठी हे सर्व केले, तेच या जगात नसल्याने त्यांनी बडोद्याकडे प्रयाण केले. बडोदा संस्थानचे अधीपती सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आश्रय देत नोकरीही दिली. सुमारे 13 वर्षे त्यांनी याठिकाणी अध्यापनाचे काम केले. फ्रेंच व इंग्रजी भाषांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. कालांतराने त्यांनी मराठी, गुजराती, तमीळ आणि संस्कृत भाषाही आत्मसात केल्या. वेद-उपनिषदांचा सखोल अभ्यास करुन त्या साहित्यांचे इंग्रजी अनुवादही त्यांनी याचठिकाणी केले. पुढे त्यांचा विष्णुभास्कर लेले या महाराष्ट्रीयन योग्याशी परिचय झाला आणि त्यांनी बडोदा येथेच योग साधनेस प्रारंभ केला. यानंतर काही काळ त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला. अटकही झाली. एक वर्षाच्या कालावधीत त्यांनी योगसाधना, लेखन याकडे अधिक लक्ष दिले. परंतू त्यापुढील काळात त्यांनी फ्रेंच वसाहत असलेल्या पॉंडेचेरी या छोट्या गावाकडे प्रस्थान केले. 1910 साली अध्यापन व राजकारणातून त्यांनी निवृत्ती घेतली. परिवर्तनाच्या वाटेने ते पॉंडेचेरीकडे ते मार्गस्थ झाले. 1910 सालचा तो काळ असावा. याचदरम्यान म्हणजे साधारणत: 1914 च्या आसपास फ्रेंच अधिकारी असलेले पॉल रिचईस हे योगींच्या संपर्कात आले. त्यांनी योगींना सांगितले, माझ्या पत्नीला अर्थात मिरा अल्फासा हिला अध्यात्मामध्ये विशेष रस आहे. तिला तुमच्याबाबत मी पत्राद्वारे कळविले आहे. तिचे काही प्रश्न तिने मला लिहून पाठविलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे तिला तुमच्याकडून हवीत. फ्रेंच भाषेवर प्रभुत्व असलेल्या योगींनी इंग्रजी प्रश्नांची उत्तरे अस्खलित फे्रंचमध्ये लिहून देत मिरा अल्फांसा यांना प्रभावित केले. त्यानंतर मिरा अल्फांसा पॉंडेचेरीत आल्या. या दोघांनी मिळून पॉंडेचेरीत श्री अरविंद आश्रम उभा केला. कर्म, ज्ञान, भक्ती यांद्वारे पूर्ण योगाची मांडणी केली. पूर्ण योग तत्वज्ञानाद्वारे ज्ञानकर्म आणि भक्ती याच्या समन्वयातून भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याचा प्रयत्न केला. माणूस हा उत्क्रांतीमधील शेवटचा टप्पा नाही. त्यानंतर अतीमाणसाचा उदय व्हायचा आहे, या संबंधीची तार्किक आणि तात्विक मांडणी त्यांनी आपल्या साहित्यातून केली. 5 डिसेंबर 1950 रोजी योगींनी आपला देह ठेवला. त्यानंतर 9 डिसेंबर 1950 रोजी श्री अरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली. पुढे 1973 सालापर्यंत श्री माताजी अर्थात मिरा अल्फांसा यांनी या आश्रमाची धुरा सांभाळली. मात्री म्हणजेच आई. मात्री हा खरेतर कोर्सिकन भाषेतील शब्द. कोर्सिकन ही फ्रान्समधील कॉर्स या भूमध्य समुद्रामधील बेटांवरील बोलीभाषा. सध्या ही भाषाही लोप पावली आहे. याच भाषेतून मात्रे हा शब्द घेवून ओरोविलमधील मात्री मंदिर उभे आहे. अरविंदांनी आपले संपूर्ण आयुष्य मानव कल्याणासाठी वेचले. त्यांचाच वारसा पुढे मिरा अल्फांसा यांनी चालवला. पुढे त्या 17 नोव्हेंबर 1973 ला पॉंडेचेरीत निर्वतल्या. त्यांच्या पश्चात त्यांचे हजारो अनुयायी वारसा पुढे चालवित आहेत. जात-पात, पंथ, धर्म, भाषा या पलिकडे जावून या दोघांनी मानव कल्याणासाठी केलेले कार्य वादातित आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी प्रा. भोसले यांच्या अमोघ वाणीतून योगी अरविंद हे नाव कानावर पडले आणि आज म्हणजेच आज त्यांच्या 72 व्या पुण्यतिथीच्या चार दिवसानंतर त्यांच्याबद्दल दोन शब्द लिहावेत असे वाटले. गेल्या आठवड्यात पॉंडेचेरीत होतो. योगी अरविंदांची समाधी,ओरोविल पाहत असताना प्राचार्य भोसले यांचे अरविंदांविषयीचे विवेचन कानामध्ये जसेच्या तसे घोंगावत होते.ओरोविल म्हणजेच योगींच्या नावातला ओरो आणि व्हिलेज मधील व्हिले असे मिळून ओरोविल योगी अरविंदांचे एक विश्वपीठ नावारुपाला आले आहे. ओरोविलच्या पवित्र भूमिवर पाय ठेवत असताना पदोपदी सोबतीने योगी असल्याची अनुभूती येत होती. त्यांनी मानव कल्याणासाठी काय केले आणि काय नाही केले, याबाबत अनेक प्रश्न आणि मत मतांतरे आहेत. परंतू फारसे चर्चिले न गेलेल्या योगींच्या कर्मभूमीत पाय ठेवताना त्यांचे अतिशय ओघवत्या शैलीत विवेचन करणार्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचेही स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. - संग्राम निकाळजे
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |
सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |