ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंदाश्रम हे प्रति मातोश्री समजले जाते. नव्वदीच्या उत्तरार्धात याचे तेज मातोश्री पेक्षाही 'पुंज' झाले होते. धर्मवीर म्हणजेच आनंद दिघे या छोट्या चणीच्या माणसाने ठाणे आणि मुंबई उपनगरामध्ये हिंदुत्वाचा एल्गार पुकारलेला होता. असे असले तरी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील त्यांच्या आनंदाश्रमात अठरा पगड जातीतील लोक प्रश्न आणि अडचणीतून मार्ग काढण्यासाठी येत असत. न्यायालयापेक्षाही येथे झटपट न्यायाचा हिशोब होत असल्याने लोकांनाही पोलीस ठाण्याची किंवा कोर्टाचे उंबरे झिजवण्यापेक्षा आनंदाश्रमामध्ये येणे कधीही न्यायाचे वाटत. याच मुशीत वाढलेल्या ठाणे येथील माजी स्थायी समिती सभापती व नगरसेवक मदन कदम याने काल दि. 19 रोजी पाटण तालुक्यात हत्याकांड घडवून आणले. यात दोघेजण जागीच ठार झाले, तर एकजण मृत्यूशी झुंज देत आहे. ज्या आनंद दिघेंनी आपले आयुष्य हिंदुत्व आणि स्वकियांसाठी झिजवले, त्याच आनंद दिघेंच्या पट्टशिष्याने द्रव्याच्या हव्यासापोटी दिघेंच्या विचारांना हरताळ फासला. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमाचे प्रॉडक्ट आणि पाटणमध्ये हत्याकांड घडवून आणणारे मदन कदम हेही तेथीलच प्रॉडक्ट. परंतू हे प्रॉडक्ट ज्यावेळी फेल होते तेव्हा थोडं लिहावंच लागतं...
मुंबईतील बॉम्बस्फोट आणि जातीय दंगलीनंतर आनंदाश्रमाचे वलय मुंबई-ठाण्यापुरते न राहता ते राज्यभर विस्तारले. आनंदाश्रम आणि आनंद दिघे हे जरी वेगळे समीकरण असले तरी दिघेंच्या खांद्याला खांदा लावून लढणारे अनेक मावळे होते. यामध्ये अर्थातच पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई-ठाण्यात गेलेले अनेक चाकरमानी यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख टाळून चालणार नाही. धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राने हे चलचित्र उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहे. मुंबईचे उदात्तीकरण हे चित्रपटांनी फार मोठ्या प्रमाणावर केले. ज्या पद्धतीने शिर्डीचे साईबाबा आणि शनी शिंगणापूरचे शनी देव, ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमारांनी देशाच्या कानाकोपर्यात पोहोचवले. त्याच पद्धतीने मुंबई मधील गुन्हेगारी, अंडरवर्ल्ड बद्दल अनेकांच्या मनात कुतुहल असते. हिंदुत्वाचा झेंडा वापरुनही त्या काळामध्ये आनंद दिघेंची लोकप्रियता वादातीत होती. तत्कालीन नगरविकास मंत्री तथा सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघेंचा जीवनपट सिल्व्हर स्क्रीनवर झळकवून उभ्या महाराष्ट्रासह आख्ख्या देशाला आनंद दिघे कोण होते, याची प्रचिती दिली.
एकनाथ शिंदे कोण, त्यांचे आणि आनंद दिघेंचे संबंध काय होते, हे आता वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही. तरीही सांगावे लागेल. पाच-सहा दशकांपूर्वी सातार्याच्या पश्चिम भागातील अवस्था भयाण होती. चेरापुंजीपेक्षा जास्त पाऊस आणि माण-खटावपेक्षाही भयानक दुष्काळ. पण, 1956 साली महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणार्या कोयना धरणाच्या बांधकामला प्रत्यक्षात सुरुवात झाली आणि 1964 साली हे धरण बांधून पूर्ण झाले. कोयना नदीवर बांधलेले हे धरण 98.77 टीएमसी चे महाराष्ट्रातील इतर धरणांपेक्षा सर्वाधिक मोठे. याच कोयना धरणाच्या पाण्याने पश्चिम महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् झाला. संपूर्ण महाराष्ट्र उजळून निघाला. त्यामुळेच कोयना धरण महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी ठरले. कोणत्याही मोठ्या वास्तुचा पाया भरताना पूर्वी कोणा ना कोणाचा बळी देण्याची रित होती, अशी वंदता होती आणि आज 50 वर्षे उलटली तरी जावलीच्या खोर्यापासून चांदोलीपर्यंतचा भाग मरणकळा सोसत आहे.
कोयनेच्या पाणलोटामुळे कांदाटी आणि तापोळा खोर्याला मुख्य भूमीपासून दूर लोटले. समाजाशी आणि नातलगांशी संपर्कात असणार्यांना पृश्यांना अस्पृश्य केले. महाराष्ट्राचे कल्याण करण्याच्या नादामध्ये हजारो कुटूंबियांची राखरांगोळी झाली. यामध्ये महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचेही कुटूंब आणि रविवारी रात्री (दि. 19/03/2023) पाटण तालुक्यातील गुरेघर येथील शिंद्रुकवाडी येथे फायरिंग करुन हत्त्याकांड घडवून आणणार्या ठाणे येथील महानगरपालिकेच्या स्थायी समितीचा माजी सभापती मदन कदम याचेही कुटूंब होते. दिवसभरात हाताची आणि तोंडाची कधीतरी गाठ पडणारी पाटण आणि जावली तालुक्यातील अनेक कुटूंबे पोटाची खळगी भरण्यासाठी चार-पाच दशकांपूर्वीच मुंबई, ठाणे परिसरात विस्थापित झाली होती. मनगटात प्रचंड रग. कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्याची ठायी असलेली हिंमत, यामुळे अनेक सातारकरांनी मुंबईतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका वाजवलेला आहे. मग याला अंडरवर्ल्ड डॉन आणि पक्का सातारकर असलेला छोटा राजनही कसा अपवाद?
शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली सातारची भूमी छत्रपतींची तिसरी राजधानी. अटकेपार झेंडे रोवणारे कण्हेरखेडचे शिंदे, होळ-मुरुमचे मल्हारराव होळकर, धावडशीची राणी लक्ष्मीबाई, सातारच्या अदालत वाड्यात आद्य पेशवा बाळाजी विश्वनाथ ला पेशवाईची वस्त्रे बहाल करणारा, असा हा सातारा. सातार्याबद्दल बोलावे तेवढे कमी व याच सातारचा रुतबा गेल्या अनेक वर्षात महाराष्ट्रात आणि खर्या अर्थाने मुंबईतही रुजला. हातघाईच्या लढाईत छातीवर वार करा, किंवा पाठीवर. शत्रूला नामोहरम करणे, हे एकच लक्ष्य असते.
गेल्या काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आणि देशामध्ये गुवाहाटी पॅटर्न चांगलाच गाजला. शिवसेनेच्या पहिल्या फळीतील मनसबदारांनी एक तृतीयांश सेनाच फोडली. दिल्लीश्वरांनी गुळाने मरणार्याला विष देवून त्याचे पातक डोक्यावर कशाला घ्यायचे, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाचा अजगर सोडला. अजगर असो किंवा फुलांचा हार, परिस्थितीनुरुप अजगराप्रमाणे फास आवळायचा की, निशीगंधाप्रमाणे चढत्या रात्री सुगंध दरवळवायचा, हे त्या-त्या गुणधर्मावर अवलंबून असते. गेल्या 7-8 महिन्यात अजूनतरी कोणत्याही गुणधर्माने साक्षात्कार दिला नसल्याने सर्वकाही आलबेल आहे.
ठाणे-टेंभी नाका-आनंदाश्रम-आनंद दिघे-एकनाथ शिंदे-मदन कदम हे सूत्र एव्हाना लक्षात आलेच असेल. यातील मदन कदम या महानुभावाने काल दि. 19 रोजी पाटण तालुक्यातील मोरणा गुरेघर येथील शिंद्रुकवाडी या गावामध्ये बारा बोअरच्या रायफलीतून गोळीबार करुन दोघांचा खून केला. तर एक मृत्यूशय्येवर आहे. आर्थिक देवाण-घेवाण, जुनी खुन्नस यातून हे हत्त्याकांड झाल्याचा निष्कर्श पोलिसांनी काढला असून त्यानुसार पोलिसांनी मदन कदम, त्याची पत्नी आणि दोन मुले यांच्यावर हत्त्येचा गुन्हा दाखल केला असून चौघेही सध्या अटकेत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असो, की मर्डरर मदन कदम. हे दोन्हीही टेंभी नाक्यावरील आनंदाश्रमातील प्रॉडक्ट. एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर दुसरा मर्डरर. राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आजच विधीमंडळात याप्रकरणी गंभीर दखल घेत राज्य शासनावर टीकेचे आसूड ओढले आहेत. तपास यंत्रणेसह पोलीस दलाची या ‘अडीच’ हत्याकांडावर बारीक नजर आहे. एकेकाळचा जाने जिगर, जानेमन म्हणजेच मर्डरर मदन कदम आज पोलीस कस्टडीत आहे, तर आनंद दिघेंशी खांद्याला खांदा लावून लढणारा तोच सवंगडी आज राज्याचा मुख्यमंत्री आहे. गेल्या काही आठवड्यांपूर्वीच उत्तर प्रदेशचे बाहुबली व गुजरात मधील साबरमती जेलमध्ये बंद असलेला माजी खासदार अतिक अहमद याने आपल्या 19 वर्षापूर्वीच्या केसमधील साक्षीदार असलेल्या व व्यवसायाने वकील असलेल्या उमेश पाल यालाच दिवसाढवळ्या गोळीबार करुन त्याची हत्या केली. ज्यामध्ये उत्तर प्रदेश पोलीस दलातील एक शिपाई शहीद झाला. मोदी आणि योगींच्या काळातही अशा फिल्मी दृश्यांना लाजवतील, अशा घटना घडताहेत. अशीच घटना काल परवा पाटण तालुक्यात घडली आहे.
पाटण मध्ये स्थानिक भूमीपूत्र तथा ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने जे हत्याकांड घडवले, ते युपी आणि बिहारला साजेसे आहे. सत्ता आल्यानंतर भल्या-भल्यांना सत्तेचा कैफ चढतो. आखाड्याच्या बाहेर असणारेही घिस्सा डाव बघून बेंडकुळ्या फुगवतात. एकनाथरावांचे दोस्त-यार असणार्या मदन कदमांनीही रविवारी रात्री अशाच बेंडकुळ्या फुगवल्या. परंतू ती बेंडकुळी दंडात न फुगता पार्श्वभागावर फुगलेली आहे. अर्थात त्याचे मुळव्याध झालेले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कृष्ण-सुदामाचे प्रेम बाजूला ठेवून शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात कायद्याचे चालते, हे दाखवून द्यावे. तुमचे सर्वोच्च न्यायालयात जे काही चालले आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही देणे-घेणे नाही. आम्ही आदर करतो तो पदाचा, सर्वोच्चपदी आपण बसलेले आहात. म्हणजे आपण मुख्यमंत्री आहात. मित्रप्रेम अचानक उफाळून येत असते. परंतू येथे प्रश्न आहे अडीच मर्डरचा. एक सातारकर म्हणून तुमच्याबद्दल निश्चितच प्रेम आहे, आदर आहे. परंतू तुम्हीही टेंभी नाक्यावरील प्रॉडक्ट आहात आणि मदनरावही तेथीलच. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि मदन खुनी. निश्चितच टेंभी नाक्यावरील प्रॉडक्ट फेल होते तेव्हा काळजाला ओरखडे पडतात.
- संग्राम निकाळजे.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |
साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |