सातारा : अखंड महाराष्ट्राचे दैवत असणार्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचे वंशज म्हणून खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे पाहिले जाते. परंतू गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय संघर्षामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. मध्यंतरी दोघांचेही मनोमिलन झाले. परंतू हे मनोमिलन काही वर्षेच टिकले. गेल्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरुन या दोघांमध्ये टोकाचे वितुष्ट निर्माण झाले. सुरुची राडा प्रकरणामध्ये हे संबंध अधिकच ताणले गेले. मात्र आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांचे मनोमिलन व्हावे, ही खुद्द शरद पवारांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
सातार्याचे छत्रपती घराणे जिल्ह्याच्या राजकारणात प्रथमपासूनच 'हेवीवेट' समजले जाते. दिवंगत माजी मंत्री अभयसिंहराजे भोसले यांचा जिल्ह्याच्या राजकारणात दबदबा होता. शरद पवारांना मानणारे म्हणून त्यांची ओळख होती. अभयसिंहराजे यांच्याविरोधात नगरपालिकेच्या माध्यमातून उदयनराजेंची 'एन्ट्री' झाली. यानंतर छत्रपती घराण्यातील अंतर्गत कलह आणि वाद सर्वश्रुत आहेत. अभयसिंहराजे यांच्याविरुद्ध उदयनराजे असा सामनाही सातारसह महाराष्ट्राने पाहिलेला आहे. 1999 साली शरद लेवेंच्या खुनामुळे सातारचे राजकीय, सामाजिक वातावरण ढवळून निघाले. विधानसभा निवडणुकीच्या आदल्या दिवशीच हा खून झाल्यामुळे एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले व उदयनराजेंचा या निवडणुकीत पराभव झाला. तब्बल 22 महिने उदयनराजेंना कारावासात रहावे लागले. यानंतर पुन्हा उदयनराजे राजकारणात 'एक्टीव्ह' झाले. दिवंगत माजी मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या घनिष्ट मैत्रीमुळे उदयनराजेंना मंत्रीपदही मिळाले होते. युती शासनाच्या पराभवानंतर उदयनराजेंना काही काळ अज्ञातवासात जावे लागले होते.
2004 साली अभयसिंहराजे भोसले यांच्या अकाली निधनामुळे त्यांचे पूत्र शिवेंद्रराजे यांना राजकारणात यावे लागले. 2004 साली झालेल्या निवडणुकीत शिवेंद्रराजे निवडूनही आले. त्यानंतर झालेल्या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने व छत्रपती घराण्यातील ज्येष्ठांच्या मध्यस्थीने सातार्यात ऐतिहासिक असे मनोमिलन झाले. हे मनोमिलन तब्बल 10 वर्षे टिकले. मात्र 2016 साली झालेल्या सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षांच्या उमेदवारीवरुन दोन्ही राजांमधील संबंध टोकाचे ताणले गेले. या निवडणुकीमध्ये खा. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने महिला प्रवर्गातून एका सामान्य महिलेला उमेदवारी दिली, तर आ. शिवेंद्रराजेंच्या नगर विकास आघाडीने शिवेंद्रराजे यांच्या पत्नी सौ. वेदांतिकाराजे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत वेदांतिकाराजेंचा पराभव झाला. यानंतर खा. उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यामध्ये तणाव अधिकच वाढला. आनेवाडी टोलनाक्याच्या निमित्ताने फलटण नरेशांनी डावपेच आखत सातारच्या दोन्ही राजांमध्ये ठिणगी टाकली. यानंतर झालेले सुरुची राडा प्रकरण सर्वश्रुत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्यावेळी उदयनराजेंच्या गाडीवर शिवेंद्रराजेंचे समर्थक वसंतराव मानकुमरे यांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. त्यामुळे सातारच्या दोन्ही राजांमध्ये टोकाचा संघर्ष निर्माण झाला होता.
गेल्यावर्षी झालेल्या खा. उदयनराजेंच्या वाढदिवस सोहळ्यावर राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी बहिष्कार टाकला होता. स्वत: राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार वाढदिवस सोहळ्याला असूनही राष्ट्रवादी आमदारांची अनुपस्थिती लक्ष वेधून घेत होती. त्यामुळे उदयनराजेंनी भरसभेत आपले आगामी मनसुबे जाहीर केले होते. राष्ट्रवादीत नाराज असलेल्या खा. उदयनराजेंना गळाला लावण्यासाठी दस्तरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोवईनाक्यावरील ग्रेड सेपरेटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कास तलावाची उंची वाढविणे, किल्ले अजिंक्यतार्याच्या संवर्धनासाठी मान्यता व निधी दिला होता. ही सर्व कामे सध्या युद्धपातळीवर सुरु आहेत. सत्तेत असूनसुद्धा उदयनराजेंची जी कामे झाली नव्हती, ती सत्तेत नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिल्यामुळे उदयनराजे पुन्हा एकदा स्वगृही (भाजपात) जाणार, अशी अटकळ अनेकांनी बांधलेली आहे. मात्र राष्ट्रवादी सुप्रिमो शरद पवार व खा. उदयनराजे यांच्यामध्ये भन्नाट 'ट्युनिंग' आहे. गोळाबेरजेच्या राजकारणात पवारांना खासदार उदयनराजे हवे आहेत. सातारा जिल्हा जरी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असला तरी सातारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात उदयनराजेंना मानणारा गट आहे. त्यात भाजपची साथ मिळाली तर सातारा हा हक्काचा लोकसभा मतदारसंघ हातातून जाण्याची भीती शरद पवारांना वाटत आहे. सातारा, कोरेगाव, वाई हे राष्ट्रवादीचे विधानसभा मतदारसंघ सध्या 'डेंजरझोन'मध्ये आहेत. उदयनराजेंशी दगाफटका केल्यास हे मतदारसंघ हातातून जाण्याची भीती खा. पवारांना वाटत असल्यामुळे पवारांनी सध्या सबुरीचे धोरण स्विकारलेले आहे.
विधानपरिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर यांना अधूनमधून उदयनराजेंना डिवचण्याची 'हुक्की' येते. मात्र, खा. शरद पवारांनी मिस्टर रामराजेंचे कान टोचल्यामुळे सध्या मिस्टर रामराजेसुद्धा 'फ्लाईट-मोड'मध्ये आहेत. सातारा-जावली मतदारसंघात भाजपचे दीपक पवार यांना मुख्यमंत्र्यांनी ताकद दिलेली आहे, तर आ. शिवेंद्रराजेंचे कट्टर असणारे अमित कदमही काही वर्षांपूर्वी भाजपवासी झाल्यामुळे आ. शिवेंद्रराजेंपुढेही मोठा पेच निर्माण झाला आहे. असे असताना खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांना एकमेकांपुरक भूमिका घेतली तरच एकमेकांना दगाफटका होण्याची शक्यता कमी आहे. अन्यथा‘धड तुला ना मला, घाल कुत्र्याला’ अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. सध्या सातारा लोकसभेच्या अनुषंगाने होणारे आरोप-प्रत्यारोप शमलेले आहेत. सालाबादप्रमाणे गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या मिस्टर रामराजेंनाही काय असेल ते माढ्याचे बघा, असा सल्ला दस्तरखुद्द राष्ट्रवादी सुप्रिमोंनी दिलेला आहे. त्यामुळे सातारा लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून उदयनराजेच हे जवळजवळ 'फिक्स' झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्यामध्ये जिव्हाळ्याचे वारे वाहू लागले आहे. एकमेकांबद्दल प्रतिक्रिया देताना अतिशय जपून भाष्य केले जात आहे. त्यामुळे येणार्या काळामध्ये खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजेंची दिलजमाई होणार, हे निश्चित आहे. मात्र ही दिलजमाई व्हावी, ही खुद्द शरद पवारांची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.
- संग्राम निकाळजे
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |