समाजात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकशाहीचा तिसरा स्तंभ समजल्या जाणार्या पोलीस दलाची लोकशाहीत महत्त्वाची भूमिका असते. कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना पोलिसांना काही वेळेस कायदा हातात घ्यावा लागतो. लाय डिटेक्टकर, नार्को टेस्ट शोधाच्या अगोदर ‘हैद्राबाद कस्टडी’ हा शब्द देशातील पोलिसांमध्ये चांगलाच रुळलेला होता. अटक न दाखवता संशयित आरोपींकडून गुन्हा वदवून घेण्याच्या पद्धतीला 'हैद्राबाद कस्टडी' असे म्हणण्याची पद्धत ढोबळ मनाने रुढ झालेली आहे. या हैद्राबाद कस्टडीमध्ये संशयित आरोपींकडून गुन्हा वदवून घेण्यासाठी पोलिसांकडून ‘फ्रि हँड’ वापरला जातो. टायरात घालणे, छताला उलटे टांगणे, करंट देणे, कोपरापासून ढोपरापर्यंत बेदम मारहाण करणे, अवघड जागेवर मिरची पूड, झंडू बाम वा तत्सम पदार्थ लावून वेदना देणे, पाय व हाताची नखे उपसणे, केस उपटणे आदी प्रकार संशयित आरोपींबाबत जोपर्यंत गुन्ह्याची कबुली देत नाहीत, तोपर्यंत ही सर्व 'चिकित्सा' संबंधित निर्ढावलेल्यावर केली जात असे. 'हैद्राबाद कस्टडी' म्हटल्यावर भलेभले आरोपी चळाचळा कापत असत. हा मार वाचावा यासाठी ते अगोदरच गुन्ह्याची कबुली देत. ‘दहा वर्षे आत बसतो, पण 'हैद्राबाद कस्टडी' नको रे बाबा’ अशी भूमिका पूर्वी गुन्हेगारांची होती. सध्या गुन्हेगारीचे स्वरुप बदललेले आहे. नवख्या गुन्हेगारांना मार सोसत नाही. सराईतांप्रमाणे मार खाण्याची सवय नसणारे पोलिसांच्या एका झापडीतच चड्डी ओली करतात.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कधी-कधी कायदा हातात घ्यावा लागतो. परंतू, हैद्राबाद कस्टडी डोक्यात गेलेले काही पोलीस अधिकार आणि ताकदीचा स्वैर वापर केल्याने गोत्यात येतात, हे आपण कराड येथील रावसाहेब जाधव व सांगली येथील अनिकेत कोथळे प्रकरणावरुन समजून घेवू शकतो. 'हैद्राबाद कस्टडी' जुन्या जमान्यातील पोलिसांचा परवलीचा शब्द. हा शब्द कुठून व कसा आला, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता असते, यासाठी अनेकांनी गुगलवर सर्चिंग मोहीम राबवली. मात्र तरीही हैद्राबाद कस्टडीबाबत हाती फारसे काही गवसले नाही. सध्या या 'हैद्राबाद कस्टडी' प्रकरणावर मराठीतील चतुरस्त्र व्यक्तिमत्व ‘ख्वाडा व बबन’ फेम भाऊराव कर्हाडे या विषयावर नवीन चित्रपट करीत आहेत. ‘ हैद्राबाद कस्टडी’ असे चित्रपटाचे टायटल असलेले पोस्टर्स सध्या सोशल मिडियावर फिरु लागले आहेत. 'मेरी आवाज सुनो', असा लिहिलेला व गिरणीच्या पट्ट्याला लाकडी मुठ बसविलेला ‘सत्य बोल पट्टा’चा आवाज पुन्हा एकदा 'हैद्राबाद कस्टडीच्या' माध्यमातून घुमणार आहे.
हैद्राबाद कस्टडी म्हणजे काय? हे चक्क त्याचा वापर करणार्या पोलीस अधिकारी वा कर्मचार्यांनाही माहित नसावे. एखादा शब्द प्रचलित झाल्यानंतर त्याच्या मुळाशी जाण्याची मजल कोणाचीही जात नाही. सुमारे दोन वर्षापूर्वी कराड शहर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीच्या प्रकरणात अटक केलेला संशयित आरोपी रावसाहेब जाधव यांना तपासाधिकारी व कर्मचार्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत रावसाहेब जाधव यांचा मृत्यू झाला होता. तसेच गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सांगली विश्रामबाग पोलीस ठाण्यातील अधिकार्यांनी अनिकेत कोथळे या युवकाला ताब्यात घेवून, छताला उलटे टांगून बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर भांबावलेल्या पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह कोल्हापूर-सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सिमेवर असणार्या अंबोली घाटामध्ये जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता. ही माहिती वार्यासारखी पसरल्यानंतर अनिकेतचा खून पोलिसांनीच केल्याच्या शक्यतेला अखेर वाचा फुटली. त्यामुळे संपूर्ण राज्य पोलीस दलच त्यावेळी आरोपीच्या पिंजर्यात उभे होते. या निमित्ताने लोप पावलेला ‘ हैद्राबाद कस्टडी’ हा शब्द पुन्हा एकदा नवीन पिढीला ऐकायला मिळाला होता.
जुन्या जाणत्या पोलीस दलात काम करणार्या पोलिसांना हैद्राबाद कस्टडी म्हणजे परवलीचा शब्द. पण जसजशी माध्यमे वाढू लागली, तसतसा मानवाधिकाराचा फास पोलीस दलाला बसू लागला. नव्वदच्या दशकात केले जाणारे ‘एन्काऊंटर’ म्हणजे एकप्रकारे निष्पापाची हत्त्याच असल्याचा आरोप तत्कालीन समाजसेवक व मानवाधिकार संघटनेत काम करणार्यांनी केल्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे नव्वदच्या दशकात धडाडणार्या पोलिसांच्या बंदुका 2000 सालापर्यंत थंड झाल्या. परिणामी एन्काऊंटर हा शब्द महाराष्ट्र दलाच्या डिक्शनरीमधून हद्दपार झाला.
प्रतिभावान दिग्दर्शक भाऊराव कर्हाडे हे विविध सामाजिक विषय, आशयघन पद्धतीने हाताळून ते चित्रपटाच्या माध्यमातून लोकाच्या समोर आणण्यात पटाईत आहेत. ‘ख्वाडा व बबन’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या डिक्शनरीतून लोप पावलेला 'हैद्राबाद कस्टडी' हा शब्द पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात घुमणार आहे. 'रझाकारीच्या काळात हैद्राबाद स्टेटमध्ये आरोपींना अटक न करता अमानवीय पद्धतीने छळ करुन त्याच्याकडून गुन्ह्याची उकल करणे किंवा तो वदवून घेण्यासाठी केलेल्या प्रक्रियेला 'हैद्राबाद कस्टडी' म्हणत असत. भारत स्वतंत्र झाल्यानंतर फार उशीराने म्हणजेच तत्कालीन गृहमंत्री तथा पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी तत्कालीन हैद्राबाद स्टेटमध्ये लष्कर घुसवून हैद्राबादच्या निझामाला शरणागती पत्करायला लावली होती.
हैद्राबाद स्टेट स्वतंत्र भारतात येवूनसुद्धा तेथील कायद्यांचा अंमल 70-80 च्या दशकापर्यंत महाराष्ट्राच्या सिमाभागामध्ये होता. पोलीस अधिकार्याला त्याकाळी फौजदार ऐवजी ‘अमीन साब’ असे संबोधले जायचे. तर.. एवढा मोठा रझाकारीचा पगडा स्वतंत्र भारतातील महाराष्ट्राच्या सिमाभागात होता. रझाकारीतील प्रचलित कायदे, रुढी व परंपरा अलिकडच्या काळापर्यंत सुरु होत्या. काळाच्या ओघात आणि ग्लोबलायझेशनमध्ये या गोष्टी आता पाठिमागे पडलेल्या आहेत. परंतू ज्या भागातून 'हैद्राबाद कस्टडी' हा प्रकार सुरु झाला, तेथून हा शब्द जरी नामशेष झाला असेल, तरीही 'हैद्राबाद कस्टडी' हा शब्द महाराष्ट्र पोलीसामध्ये आजपावेतो रुजलेला आहे. अधुनमधून महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात सांगली आणि कराडमध्ये घडलेल्या घटना कानावर येत असतात. त्या-त्या निमित्ताने हैद्राबाद कस्टडी हा शब्द कानावर अनपेक्षितपणे आदळला जातो. त्यामुळे वर्षानुवर्षे या शब्दाबद्दल उत्कंठा वाढत जात होती. जुन्या पिढीला या शब्दाबद्दल फारसे स्वारस्य नाही, परंतू नव्या पिढीला भाऊराव कर्हाडेंच्या आगामी चित्रपटाच्या माध्यमातून हैद्राबाद कस्टडीचा थरार ‘याची देही, याची डोळा’ पहावयास मिळणार आहे. त्यामुळे आता ‘दिल थाम के बैठिये...!’
-संग्राम निकाळजे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |