06:40pm | May 09, 2019 |
सातारा : सोमवार पेठ, फलटण येथील सर्व्हे नं. 6 वर नगरपालिकेने टाकलेल्या आरक्षण क्र. 53, 54 वरील ओपन स्पेस भूखंड घोटाळाप्रकरणी फलटण नरेश, त्यांचे दोन दाढीवाले बंधू, श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चर, तत्कालीन नगराध्यक्ष व फलटण पालिकेचे मुख्याधिकारी यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. फलटण पालिकेतील विरोधी पक्षातील सदस्यांनीही आज दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात आज याप्रकरणी याचिका दाखल केलेली आहे. दरम्यान, आचारसंहिता संपताच या घोटाळेबाजांवर ईडी चा फास मात्र आवळला जाणार आहे.
5 मे रोजी ‘सातारा टुडे’ने ‘100 कुटूंबाना देशोधडीला लावून 21 कोटी घशात घालण्याचा फलटण नरेशांचा प्रयत्न’ या मथळ्याखाली फलटणमधील सोमवार पेठेतील ओपन स्पेस भूखंड घोटाळा प्रकरणी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे फलटणसह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. फलटण नरेश व त्यांच्या दोघा दाढीवाल्या बंधूंनी सत्तेच्या जोरावर फलटण तालुक्यातील अनेक घोटाळे पचवले आहेत. मात्र, सोमवार पेठेतील ओपन स्पेस घोटाळ्याप्रकरणी ‘सातारा टुडे’चे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर फलटण नरेशांचा काळा चेहरा जगासमोर उघडा झाला आहे. दरम्यान, वृत्त प्रकाशित झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत. आचारसंहिता संपताच फलटण नरेश, त्यांच्या दोन दाढीवाल्या बंधूंसह श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चर ईडीच्या (सक्त वसुली संचालनालय) रडारावर येणार आहेत. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयाने एवढ्या मोठ्या घोटाळ्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने जिल्हाधिकार्यांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
फलटणमधील सोमवार पेठेतील सिसनं 6 या जागेवर गेल्या 50 वर्षांपासून अनुसूचित जाती-जमाती व भटक्या विमुक्त लोकांची वसाहत आहे. हे लोक पन्नास वर्षांपासून आपल्या घराचा मिळकत कर, पाणीपट्टी, वीज बिल भरत आहेत. सिसनं. 6 ही जागा श्रीराम सहकारी साखर कारखान्याचा ओपन स्पेस आहे. काही वर्षांपूर्वी नियम धाब्यावर बसवून फलटण नरेश व त्यांच्या दोन बंधूंनी ही जागा श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चर या बांधकाम कंपनीला विकली होती. या कंपनीमध्ये सातार्यातील घार्गे, ठक्कर, भंडारी व इतर बडे बिल्डर संचालक आहेत. वास्तविक नियमानुसार ओपन स्पेस जागेची खरेदी-विक्री होत नाही. असे असतानाही फलटण नरेशांनी आपले राजकीय वजन वापरुन या जागेची विक्री केली होती. हीच ओपन स्पेस जागा नगरपालिकेलाच विकण्याचा घाट फलटण नरेशांसह त्यांच्या दोघा दाढीवाल्या बंधूंनी घातला होता. नगरपालिकेला शाळा, खेळाचे मैदान, व्यायामशाळेसाठी जागेसाठी ही जागा अधिगृहित करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चरकडून देण्यात आले होते. नगरपालिका व श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चरची मिलीभगत असल्यामुळे फलटण नगरपालिकेने विशेष सभा बोलावून ‘त्या’ ओपन स्पेस जागेवर आरक्षण क्र. 53, 54 टाकून ठराव मंजूर केला होता. वास्तविक ओपन स्पेस ही जागा नगरपालिकेच्या मालकीची असते. परंतू फलटण नरेशांनी आपला मेंदू सुपरफास्ट चालवून नगरपालिकेचीच जागा नगरपालिकेला विकण्याचा भन्नाट घाट घातला. त्याला तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व नगररचना अधिकार्यांनी वस्तुस्थिती लपवून त्या जागेवर कोणत्याही प्रकारची लोकवस्ती नाही, असा खोटा अहवाल फलटण नरेशांच्या सांगण्यावरुन नगरविकास खात्याला दिला. त्यानुसार नगरविकास खात्याकडून सुमारे 21 कोटींचा निधीही मिळवण्यात यश मिळवले. सुमारे दीड वर्षापूर्वी ‘सातारा टुडे’ने या संदर्भात वृत्तही प्रकाशित केले होते. फलटण पालिकेतील विरोधी बाकावरील सदस्यसही यासंदर्भात उच्च न्यायालयात गेले होते. परंतू जिल्हाधिकारी कार्यालयाने यासंदर्भात कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने त्या जागेची रक्कम जवळ-जवळ फलटण नरेशांच्या घशात जाणारच होती. मात्र, ‘सातारा टुडे’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याबाबतची गंभीर दखल घेत फलटण नरेशांसह त्यांच्या पिलावळीने केलेल्या घोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सोमवार पेठेतील ‘त्या’ जागेवर असलेल्या वसाहतीमधील रहिवाशांना दमदाटी करणार्यांना सोमाशेठ उर्फ कात्या भाईच्याही गुन्हेगारी कुंडल्या काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. त्यामुळे सोमवार पेठेत 2 कोटीच्या वाट्यासाठी घातक पार्ट-2 घडविण्याच्या बेतात असणार्या सोमा शेठ उर्फ कात्या भाईवरही ‘मुख्यमंत्र्यांचा ढाई किलो का हाथ’ लवकरच पडणार आहे.
फलटण नरेश, त्यांचे दोन दाढीवाले बंधू, श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चरमधील घार्गे, भंडारी, ठक्कर व इतर संचालकांसह फलटण पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगररचना विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयही ईडी च्या रडारावर येणार आहेत. फलटण पालिकेतील विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, सचिन बेडके यांनी याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज या जागेसंदर्भात जनहित याचिकाही दाखल केलेली आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणातील घोटाळेबाजांना कायद्याचा फास बसणार आहे. फलटण तालुक्याला स्वत:ची जहागिरी समजणार्या फलटण नरेशांना जाता-जाता फलटणकरांवर केलेल्या अन्यायाचा ‘हिशोब’ देवून जावे लागणार आहे. त्यामुळे ‘एकाची जळते दाढी, दुसरा त्यावर पेटवू पाहतो बिडी’, अशा प्रवृत्तींनी फलटण तालुक्यातील राजकारणात लोकांच्या सोशिकतेमुळे बाळसे धरले. परंतू ‘सातारा टुडे’ने गेल्या 7 वर्षातील आपल्या परखड लेखणीमुळे फलटण नरेशांसह त्यांच्या दोघा दाढीवाल्या बंधूंचा बुरखा टराटरा फाडलेला आहे. फलटणमधील सोमवार पेठेतील ‘ती’ जागा घशात घालू पाहणार्या फलटण नरेशांना ‘सातारा टुडे’च्या दणक्यामुळे मात्र थोबाड फोडून घ्यावे लागले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाचेही ‘मापात पाप’
फलटणमधील सोमवार पेठेतील ‘ते’ ओपन स्पेस प्रकरण गेली दीड वर्ष झाले जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात पडून होते. ओपन स्पेस घोटाळ्यासंदर्भातील अनेक तक्रारी, पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यालयाशी करण्यात आलेला होता. परंतू या दीड वर्षामध्ये यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील एक कस्पटही हाललेले नाही. नगरविकास खात्याकडून सातारा ट्रेझरी कार्यालयात सुमारे 21 कोटी रुपये वर्ग करण्यात आले होते. जिल्हाधिकार्यांच्या प्रशासकीय मंजुरीनंतर ते पैसे फलटण पालिकेकडे वर्ग करण्यात येणार होते आणि पालिका याचा धनादेश संबंधित बिल्डर व पर्यायाने फलटण नरेशांच्या घशात घालणार होते. हाच पैसा येणार्या विधानसभा निवडणुकीत वापरला जाणार होता. मात्र, ‘सातारा टुडे’च्या दणक्यामुळे अनेकांची आर्थिक गणिते यानिमित्ताने बिघडलेली आहेत. मात्र, तक्रारींवर तक्रारी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय हातावर हात ठेवून गप्प बसल्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय, या शक्यतेला वाव मिळाला आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्यामुळे अनेक ‘बड्या’ अधिकार्यांची ‘विकेट’ मात्र पडणार आहे.
- संग्राम निकाळजे
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |