सातारा : सातारा जिल्हा हा राज्यामध्ये शांतताप्रिय, सहकार चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र जिल्ह्यातील वाळू जेव्हापासून काळे सोने ठरु लागली, तेव्हापासून जिल्ह्यामध्ये टोळीयुद्ध सुरु झाले. या टोळीयुद्धात अग्निशस्त्राचा वापर अभिमानाची गोष्ट ठरु लागली. महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला. यानंतर जिल्ह्यामध्ये टोळीयुद्ध नित्याचेच झाले. अग्निशस्त्रांचा वापर स्वैरपणे होवू लागला. आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्रांचा वापर करुन अनेकांचे मुडदे पाडले गेलेत.
२० ऑगस्ट २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर भल्या सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती यावेळी संशयाची सुई सनातन संस्थेकडे वेळोवेळी फिरत होती. मात्र तपास यंत्रणांना ठोस असे काही हाती लागत नव्हते. मारेकर्यांना शोधण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तांना चक्क प्लॅन्चेटचा आधार घ्यावा लागला होता. त्यावेळी तत्कालीन पुणे पोलीस आयुक्तांवर टीकेचा भडीमार झाला होता. यानंतर काही दिवसांतच पुणे आयुक्तांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. पुणे पोलीस आणि राज्य दहशतवादी विरोधी पथक दाभोलकर हत्त्येचा संयुक्तपणे तपास करीत होते. जंग जंग पछाडले तरी या दोन्ही तपास यंत्रणांच्या हाताला काहीच गवसत नव्हते. असे असताना पुणे विद्यापीठातील सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणातील आणि डॉ. दाभोलकरांच्या खून प्रकरणात वापरण्यात आलेले पिस्टल हे एकच असल्याचे बेलेस्टिक एक्सपर्टच्या अहवालानुसार स्पष्ट झाले होते. त्यानुसार दहशतवादी विरोधी पथकाने इचलकरंजी येथील विलास रामअवतार खंडेलवाल या युवकाला तपासासाठी ताब्यात घेतल्यानंतर अवैध बंदुक तस्कर मनीष रामविलास नागोरी रा. इचलकरंजी याचे नाव समोर आले होते.
त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता मनीष नागोरी याने सातारा जिल्ह्यात व राज्यभरात शेकडो पिस्टल विक्री केल्याचे एटीएसच्या तत्कालीन अधिकार्यांच्या लक्षात आले होते. त्यानुसार एटीएसच्या तपास पथकाने सातारा जिल्ह्यातील अनेक अवैध अग्निशस्त्र बाळगणार्यांची उचलबांगडी केली होती. भले-भले नामचीन सातार्यातून कारवाईच्या भीतीने गायब झाले होते. यामध्ये बिल्डर, पुढारी, महाविद्यालयीन तरुण, शेतकरी, शिक्षक, कारखानदार आदींनी मनीष नागोरी याच्याकडून काही हजारांमध्ये अग्निशस्त्र खरेदी केले होते. एटीएसने उचलबांगडी केल्यानंतर अनेकांनी आपापल्या गॉडफादरचा आश्रय घेत यामध्ये तडजोड करण्याचा प्रयत्न केला होता. या कारवायांमध्ये एटीएसने जिल्ह्यातून पाचशेपेक्षा जास्त अग्निशस्त्रे जप्त केल्याची चर्चा होती. मात्र या संदर्भात एटीएसने अग्निशस्त्रे जमा करुन घेतली. परंतू गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे अनेकजण एटीएसच्या कचाट्यातून सहिसलामत सुटले. त्यामुळे यामध्ये मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही.
एटीएसने डॉ. दाभोलकर हत्त्येच्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील योगेश चोरगे, कराड येथून मंगेश पगारे, इचलकरंजीतून मनीष नागोरी, विकास खंडेलवाल यांना उचलले होते. यांच्यावर एटीएसने रितसर गुन्हे दाखल केले होते. संबंधितांना न्यायालयातून जामीन मिळताच त्यांनी पुन्हा सातार्यात अवैध शस्त्र तस्करीचा धंदा जोमाने सुरु केला. एवढे रामायण घडूनसुद्धा एटीएसच्या बोटचेप्या भूमिकेमुळे मनीष नागोरीने शेकडो अग्निशस्त्रे सातारा जिल्ह्यामध्ये विकलेली आहेत. अवैध शस्त्र तस्करी मुख्यत्वे उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील मुंगेर येथून मोठ्या प्रमाणावर होत असते. मुंगेर मेड असणारे पिस्टल मुख्यत्वे पॉईंट 32 कॅलिबरचे (7.62 एमएम) असते. दुसर्या महायुद्धामध्ये अमेरिकन ब्राऊनिंग शस्त्र निर्मिती कंपनीने 1911 हे पिस्टलचे मॉडेल तयार केले होते. ब्रिटीशांनी हेच मॉडेल भारतामध्येसुद्धा सर्व्हिस रिव्हॉल्व्हर म्हणून वापरले होते. मुख्यत्वे याच पिस्तुलाच्या डिझाईनचा व 'डायचा' वापर करून मुंगेर मेड पिस्तुल बनवले जातात.
मुंगेर मेड पिस्तुलाची चलती..
मुंगेर येथे ब्रिटीशांचा शस्त्र निर्मिती कारखाना होता. ब्रिटीश भारतातून गेल्यानंतर हा कारखाना बंद झाला. त्यानंतर कारखान्यात काम करत असणार्या कुशल कामगारांनी उपलब्ध साधनांद्वारे अवैध शस्त्र निर्मिती केली. यामध्ये मुख्यत्वे 9 एमएम पिस्टल, 0.32 कॅलिबर पिस्टलची निर्मिती मोठ्या प्रमाणावर केली गेली. त्यामुळे मुंगेर हे खर्या अर्थाने अवैध शस्त्रांची पंढरी म्हणून ओळखली जावू लागली. देशभरातील अनेक शस्त्र तस्कर मुंगेर येथून पिस्टल घेवून त्याची विक्री आपापल्या राज्यात करीत आहेत. मनीष नागोरीनेही झटपट पैसा कमवायच्या नादात मुंगेर मेड पिस्तुलांचा सातार्यात बाजार केला. एरवी खायला 'मोताद' असणारेही कमरेला पिस्तुल लावून सातार्यातून फिरु लागले. हे केवळ मनीष नागोरीमुळेच. सातार्यातील रविवार पेठेत बसून मनीष नागोरीने राज्यात व जिल्ह्यात शेकडो पिस्तुल विक्री केली. हिच अग्निशस्त्रे आज मार्केटमध्ये फिरत आहेत.
कंबरेला पिस्तुल असल्यानंतर फळकूट दादाही 'अंडरवर्ल्ड डॉनचा' आव आणतात. परवा बुधवार नाक्यावर घडलेली घटनाही याचेच द्योतक आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्त्येनंतर तपासाच्या अनुषंगाने राज्य दहशतवाद विरोधी पथकाने मनीष नागोरीकडून पिस्टल खरेदी केलेल्या शेकडो लोकांवर आर्म ऍक्टनुसार त्याचवेळी कारवाई केली असती तर आज सातार्यात अग्निशस्त्रे औषधालाही शिल्लक राहिली नसती. परंतू राजकीय हस्तक्षेपामुळे की आर्थिक देवाण-घेवाणीमुळे एटीएसने अवैध शस्त्र प्रकरणी शेपटी घातली. याचे उत्तर आजपर्यंत मिळालेले नाही. आजही सातारा जिल्ह्यात सुमारे साडेतीनशेपेक्षा जास्त अवैध शस्त्रे लोक चोरी-छुपे बाळगून आहेत. भविष्यामध्ये मोठे 'कांड' होण्याअगोदरच पोलिसांना अवैध शस्त्र प्रकरणी कडक पावले उचलावी लागणार आहेत.
- संग्राम निकाळजे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |